Indapur Politics : शरद पवारांना बालेकिल्लात मोठा धक्का; तीन शिलेदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

इंदापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात शरद पवार यांच्या गटाला मोठा फटका बसला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या जवळच्या तीन प्रमुख नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, हर्षवर्धन मोटार वाहतूक संघाचे माजी अध्यक्ष रघुनाथ राऊत आणि माजी नगरसेवक गोरख शिंदे यांचा समावेश आहे. हे तिन्ही नेते येत्या दोन दिवसांत मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे पक्षप्रवेश करणार आहेत.
या घडामोडींमुळे इंदापूरच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून, दत्तात्रय भरणे यांची ही खेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानली जात आहे. हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील राजकीय वैर सर्वपरिचित आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा अजित पवार गटाला मिळाल्याने पाटील यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, परंतु त्यांचा पराभव झाला. त्यानंतर दोघांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला.
आता भरणे यांनी पाटील यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षात घेऊन मोठी राजकीय चाल खेळली आहे. या पक्षप्रवेशाचा आगामी निवडणुकांवर कसा परिणाम होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.





