अमित शाहांना शरद पवारांचे एका वाक्यात प्रत्युत्तर,”गुजरातमधून तडीपार केलेला हा माणूस…”

Sharad Pawar । भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने पुण्यात बालेवाडी येथे आयोजित केलेल्या महाअधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीसह राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.
निवडणुका जिंकण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद्चंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी अनेक खोटे दावे केले. दूध पावडर आयात केल्याचा खोटा दावा निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारांनी केला, भ्रष्टाचाराचे आरोप केले, परंतु भारताच्या राजकारणातील सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा सरदार हे शरद पवार आहे, असा जोरदार घणाघात शाह यांनी केला. यावर माविआ नेत्यांकडून प्रतिउत्तर देण्यात आले असून आता शरद पवार यांनी सुद्धा यावर भाष्य केलं आहे.
शरद पवार म्हणाले,’सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. ते मागे एका भाषणात म्हणाले होते, शरद पवार हे भ्रष्टाचारी लोकांचे सुभेदार आहेत. पण, देशाच्या गृहमंत्रिपदावर बसलेल्या या माणसाला सुप्रीम कोर्टाने तडीपार केलं होतं. अमित शाह हे जेव्हा गुजरातमध्ये होते. तेव्हा त्यांनी कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखली जावी म्हणून त्यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं. तो माणूस आता देशाचा गृहमंत्री झाला आणि देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन अशी वक्तव्ये करत आहे
दरम्यान, अमित शाह यांच्या टीकेवर खासदार सुप्रिया सुळे यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या,’आज भाजपचे लोक ज्याला एनडीए सरकार म्हणतात, ते काही महिन्यांपूर्वी मोदी सरकार होतं. याच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यामुळे शरद पवार नक्की काय आहेत हे भाजपनं ठरवावं. अमित शाह हे त्याच सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, हे सर्व ते विसरले असतील, त्यामुळे त्यांनी टीका केली,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.





