Satara : शरद पवार यांचे सर्वच क्षेत्रांत योगदान लाख मोलाचे

सातारा : महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि देशाचे नेते खा. शरद पवार यांचे फक्त राजकारणात नाही तर सर्व क्षेत्रातील त्यांचे योगदान लाख मोलाचे आहे. त्यांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या पद्धतीने संसदीय कारकर्दीची ५० वर्षे पूर्ण केली. त्यांच्याबरोबर प्रदीर्घ काळ काम करण्याची संधी मला मिळाल्याचे मी भाग्य समजतो, असे मत माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या हस्ते केक कापून शरद पवार यांचा ८४ वा वाढदिवस राष्ट्रवादी भवनात उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त जिल्हयात विविध ठिकाणी उपक्रम राबविण्यात आले असून त्यात प्रामुख्याने ८४ उत्कृष्ट विद्यार्थी, ८४ ज्येष्ठ नागरिक, ८४ विशेष कार्य केलेल्या महिलांचे सत्कार आयोजित करण्यात आले असून तसेच विविध ठिकाणी रक्तदान शिबिर व वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी बाळासाहेब पाटील बोलत होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले, १२- १२ ही तारीख आठवली तरी सर्व भारतवासियांच्या डोळयासमोर येते ते नाव शरद पवार यांचा वाढदिवस. भारतातील कमीत कमी ८० टक्के लोकांना तरी शरद पवार यांचे नाव या ना त्या कारणाने स्मरणात राहणार आहे. सहकार क्षेत्रातील त्यांची पकड आज सर्वश्रुत आहे. त्याचप्रमाणे लहानात लहान कार्यकर्त्याबद्दल असलेली जवळीक व आपुलकी ही त्यांच्या राजकारणातील सर्वात जमेची बाजू आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, नागेश साळुंखे, संभाजीराव शिंदे, गोरखनाथ नलवडे, शफीक शेख, कॉ. अस्लम तडसरकर, महिलाध्यक्ष संजना जगदाळे, अर्चना देशमुख, अतुल शिंदे, सचिन जाधव, मेघाताई नलावडे, विजय बोबडे, मकरंद बोडके, मोहनराव जाधव, स्वप्निल वाघमारे, विजय चौधरी, सागर झणझणे, ॲड. रणजितसिंह जगदाळे, बाळासाहेब शिंदे, अमोल पाटोळे, अंजली रजपूत, प्रज्ञा गायकवाड, भारती काळंगे, प्रदीप लगस, बबनराव निकम, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.





