मुंबई- देशभरात वक्फ बोर्ड विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रातही या मुद्द्यावरून शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी पेटली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंना डिवचलं, तर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप करत गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडलं. ठाकरेंचं म्हणणं आहे की, विधेयकाला विरोध नाही, तर त्यामागील गैरव्यवहारांना आक्षेप आहे. लोकसभेत बहुमताच्या जोरावर हे विधेयक मंजूर झालं असून, आज राज्यसभेत चर्चा सुरू आहे. मात्र, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार मतदानावेळी गैरहजर राहणार असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. राज्यसभेत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. “मुसलमानांची इतकी काळजी जिन्नांनाही नव्हती, त्यांचा आत्मा तुमच्यात शिरलाय का?” असा टोला लगावत त्यांनी सभागृहात गोंधळ घातला. शिवसेनेने या विधेयकाला विरोध करत मतदानातही नकार दिला. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार आज राज्यसभेतील मतदानाला अनुपस्थित राहणार आहेत. बुधवार आणि गुरुवारी ते मुंबईत आहेत, तर उद्या दिल्लीला रवाना होणार आहेत. लोकसभेत विधेयक मंजूर झालं तेव्हा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि सुरेश बाळ्या मामा म्हात्रेही गैरहजर होते. विशेष म्हणजे, जेपीसी समितीचे सदस्य असलेले म्हात्रे यांची अनुपस्थितीही लक्षवेधी ठरली. आता राज्यसभेतील मतदानाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेत १२ तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. पहाटे २ वाजता झालेल्या मतदानात ५२० खासदारांनी भाग घेतला. २८८ जणांनी बाजूने तर २३२ जणांनी विरोधात मतदान केले. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी याला उमीद (युनिफाइड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट, एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट) असे नाव दिले आहे. हे विधेयक आज राज्यसभेत सादर केले आहे.