शरद पवारांनी घेतली बाबा आढावांची भेट; म्हणाले “सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर…”

Sharad Pawar Meets Baba Adhav | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. मात्र या निकालानंतर अनेकांकडून ईव्हीएम मशीनबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यापार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेष उपोषणाची भूमिका घेतली.
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून २८ नोव्हेंबरपासून पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे डॉ. बाबा आढाव हे आत्मक्लेश उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाची दखल राजकीय नेतेमंडळींकडून देखील घेतली जात आहे.
आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महात्मा फुले वाड्यात बाबा आढाव यांची भेट घेतली. तसेच या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यासंबंधीची अस्वस्थता संपूर्ण राज्यात दिसत आहे. माझ्या हातात पुरावा नाही, पण अनेकांच्या मनात शंका आहे की ईव्हीएमद्वारे निवडणुकीत गैरप्रकार होत आहेत. निवडणुकीत झालेली अनियमितता पाहून बाबा आढाव यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला.” यावेळी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
राज्यात विधानसभा निवडणुक निकालानंतर या प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात अस्वस्थता दिसत आहे. यातून देशाच्या लोकशाहीवर होणारे दूरगामी विपरीत परिणाम लक्षात घेऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेष उपोषणाची भूमिका घेतली. पुणे येथील महात्मा फुले वाड्यात होणाऱ्या या… pic.twitter.com/PFTAGb05Pe
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 30, 2024
या निवडणुकीत झालेला सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याआधी कधीही पाहायला मिळाला नव्हता. स्थानिक निवडणुकांत अशा घटना ऐकायला मिळतात. पण राज्याच्या निवडणुकात असे चित्र कधी पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काही लोकांनी ईव्हीएम कसे सेट केले जाते, याचे आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते. आमची कमतरता होती की, आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल, असे कधी वाटले नसल्याचेही यावेळी शरद पवार म्हणाले.
निवडणूक आयोगावर संशय
निवडणुक आयोगाबाबत शरद पवार यांनी सांगितले की, “आम्ही यापूर्वी कधी निवडणूक आयोग या संस्थेवर संशय व्यक्त केला नाही. पण निकालानंतर आता तथ्य दिसत आहे. राज्यातील २२ उमेदवारांनी फेरमतमोजणी करण्यासाठी अर्ज केला आहे. यातून काही साध्य होईल का? याबाबत मला शंका वाटते. निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी लोकांमध्ये पुन्हा जावे लागेल.”
“बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा परिणाम आज ना उद्या झाल्याशिवाय राहणार नाही. इंडिया आघाडीकडून ईव्हीएमवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी सखोल चर्चा आणि उपाययोजना गरजेची आहे,” असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
…अन्यथा संसदीय लोकशाही उध्वस्त होईल
“लोकांना जागृत करावं लागेल, ते जागरूक आहेत. पण त्यांनी उठाव केला पाहिजे. अन्यथा संसदीय लोकशाही उध्वस्त होईल. देशाची सूत्रे ज्यांच्या हाती आहेत, त्यांना याची काही पडलेली नाही. संसदेत आम्ही मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला बोलू देत नाहीत,” असेही शरद पवार म्हणाले.
हेही वाचा:
भाजपच्या ‘या’ ऑफरला एकनाथ शिंदेंकडून कोणताही प्रतिसाद नाही ; आता नेमकी कोणती भूमिका घेणार ?





