‘शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील देव त्यांनी निर्णय मागे घ्यावा’; शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराची मागणी

नाशिक- शरद पवार हे महाराष्ट्राला लाभलेले उत्तुंग असे व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची गरज आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील देव म्हटले तर त्यात वावगे ठरणार नाही. अशा व्यक्तीची आज महाराष्ट्राला गरज आहे. परंतु जर त्यांनी निवृत्ती घेतली तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव असेल. मी जनतेच्या वतीने शरद पवार यांना विनंती करतो की, आपली महाराष्ट्राला, देशाला गरज आहे. त्यामुळे आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ नये, असे मत नाशिकचे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी राजकीय निवृत्तीचे सूतोवाच केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यांच्या या निर्णयाला पक्षातील नेत्यांसह आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला होता. त्यानंतर आता विरोधी पक्षातील आमदारांकडूनही पवारांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा असा आग्रह होताना दिसत आहे. त्यात कांदे यांनीही पवारांना चक्क राजकारणातील देव म्हणत निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.
कांदे बोलताना पुढे म्हणाले, “सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलाने देशाच्या राजकारणात मोठे पाऊल टाकत स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले, जे आम्हा सर्वांसाठीच अत्यंत प्रेरणादायी आहे. आज महाराष्ट्रासह देशाचे नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. शरद पवार यांना पाहूनच आम्ही राजकारणात आलो. पवार यांनी जर निवृत्ती घेतली तर याचे पुढचे राजकारण हे खरंतर सांगता येणार नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. यावर ते निर्णय घेतील.





