Sharad Pawar : शरद पवारांनी ‘या’ 2 बंडखोर नेत्यांचे केले निलंबन

मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून उद्या सोमवारी प्रचार संपणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बंडखोर नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही आता आपल्या दोन बंडखोर नेत्यांवर कारवाई करत त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विक्रम पाचपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार पक्षाचे नेते राहुल जगताप यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र जागेवर अजित पवार पक्षाकडून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्यात आली.
त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक असलेले राहुल जगताप नाराज झाले आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आता त्यांच्यावर शरद पवार पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, महायुतीकडून हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार असलेल्या समीर कुणावार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडीकडून शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांना तिकीट मिळाले. मात्र शरद पवार पक्षाकडून माजी आमदार राजू तिमांडे हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते.
त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र आता त्यांच्यावरही कारवाई केली आहे. राजू तिमांडे यांना निलंबित करत शरद पवार पक्षाने त्यांनाही घरचा रस्ता दाखवला आहे.





