पुणे जिल्हा | शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना पाठबळ

इंदापूर, (प्रतिनिधी) – राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेश कार्यक्रमातच हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत पाठवा म्हणूनच तालुक्यातील मतदारांना शरद पवार यांनी आवाहन केले.
त्यामुळे इंदापूर विधानसभेची उमेदवारी हर्षवर्धन पाटील यांची फिक्स केली. लगेचच पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये पाटील यांची नियुक्ती करत हर्षवर्धन पाटील यांना मानाचे स्थान देण्याचे धोरण खुद्द शरद पवार यांनी यशस्वी राबवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
इंदापूर तालुक्यातील राजकीय गणिते जुळवण्याची कला, शरद पवार यांच्याकडे अनेक वर्षापासून, मोठी अवगत आहे. याचा प्रत्यय तालुक्यातील घराघरात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात, विचारात दाखल झाले. मागील काही महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचा करिष्मा राज्यातील जनतेसमोर आला.
त्यामुळे सत्तेमधील व इतर विरोधक देखील शरद पवारांना साथ देण्यासाठी अनेकांनी तुतारी हातात घेतली. लोकसभा निवडणुकीत इंदापूर तालुक्यात तुतारीची हवा राज्यभर चालली, इंदापूर विधानसभेला त्या ताकदीचा नेता शरद पवारांना हर्षवर्धन पाटलांच्या रूपाने सापडला.
यामध्ये आपणाला साथ दिलेले जुने सहकारी यांनी बंडखोरी करण्यापर्यंत मजल मारली; परंतु घेतलेला निर्णय, दिलेला शब्द, शरद पवारांनी तंतोतंत पालन करत काही दिवसातच थेट, आपल्या पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये हर्षवर्धन पाटील यांना मानाचे स्थान देऊन, मोठे राजकीय पाठबळ दिले आहे.
तसे पाहिले तर हर्षवर्धन पाटील यांची सहकार क्षेत्रावर फार मोठी पकड असून, ते या सहकार क्षेत्राचे मोठे अभ्यासक आहेत. त्यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाला राज्यभर मोठा फायदा होणार आहे.
हर्षवर्धन पाटील यांची राजकीय कुवत प्रदीर्घ मोठी असल्याने, त्यांना विधानसभा निवडणुकीनंतर, पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची, जबाबदारी व राज्यातील महत्त्वाची जबाबदारी सांभाळावी लागणार असे स्पष्ट संकेतच शरद पवार यांनी दिले आहेत.
कुटुंब प्रचारात
सध्या इंदापूर तालुक्यात विधानसभेअगोदर असणारी तयारी राजकीय पक्षांनी सुरू केले आहे. यामध्ये संपूर्ण तालुका पिंजून काढण्यामध्ये, युवक नेते राजवर्धन पाटील तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अंकिता पाटील ठाकरे यांनी मोठी प्रचारात आघाडी घेतली आहे.
तालुक्यातील युवक वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडे, राजवर्धन पाटील, अंकिता ठाकरे पाटील यांच्यामुळे मोठ्या विस्तृत प्रमाणात आकर्षित होत आहे.
प्रचाराच्या अगोदरच, तालुक्यातील महत्त्वाचे मुद्दे, जनतेसमोर आणत. अनेक विरोधकांची बोलती बंद करण्याची ठोस भूमिका, अंकिता पाटील ठाकरे यांनी घेतलेली दिसते.
सुप्रिया सुळे यांच्या निर्णयाकडे लक्ष
खासदार सुप्रिया सुळे यांचे, इंदापूर तालुक्यावर अत्यंत बारकाईने लक्ष असून, प्रत्येक कार्यकर्त्याची पदाधिकार्याची जबाबदारी खासदार सुळे यांनी स्वतः घेतली आहे.
त्या दोन दिवसात इंदापूर दौर्यावर येत आहेत. त्यामुळे नाराज असलेल्या नेत्यांचे खासदार सुळे कशा पद्धतीने मनोमिलन करतात. काय निर्णय घेतात याकडे इंदापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.





