फडतूस-काडतूस वादावर बोलताना शरद पवारांच्या ठाकरे, फडणवीसांना कानपिचक्या

Sharad Pawar on Thackeray Fadanvis – काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना, ‘फडतूस’ संबोधलं होत. उद्धव ठाकरेंची टीका जिव्हारी लागलेल्या फडणवीसांनी देखील लागलीच पलटवार करत, ‘मै फडतूस नही, काडतूस हू… झुकेगा नही, घुसेगा साला.’ असा पुष्पा स्टाईल डायलॉग मारला. यानंतर ठाकरे – फडणवीसांच्या समर्थकांनी यात उडी घेत वातावरण अधिकच तापवलं. या सर्व प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करतं ठाकरे व फडणवीस दोघांनाही कानपिचक्या दिल्या आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. हा हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांवर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड केली.
“महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभलाय” असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं. देवेंद्र फडणवीसांनी लागलीच प्रत्युत्तर देत, “मै फडतूस नही, काडतूस हू… झुकेगा नही, घुसेगा साला” असं म्हंटलं.
काय म्हणाले शरद पवार? | Sharad Pawar on Thackeray Fadanvis
शरद पवार यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना, “मला जो महाराष्ट्र माहीत आहे. मला जी महाराष्ट्रातील संस्कृती माहीत आहे. मला महाराष्ट्रातील जनतेची मानसिकता माहीत आहे. त्यामुळे अशा गोष्टी शक्यतो टाळायला हव्यात. वैयक्तिक टीका करू नये.”
“तुम्ही राजकीय किंवा लोकांच्या प्रश्नांवरून आक्रमक राहा. पण वैयक्तिक टीका टिप्पणी किंवा चिखलफेक करून नका. अशी स्थिती निर्माण होणार नाही, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवं. राजकारणात मतभेद असतात, मतभिन्नता असते. पण टोकाची भूमिका घेणं आपण टाळलं पाहिजे.” अशी प्रतिक्रिया दिली.





