शरद पवारांना PM करण्यासाठी राबवले ‘मॅनेज दिल्ली’ अभियान; ‘२४ अकबर रोड’चा ‘तो’ गाजलेला किस्सा काय?

Sharad Pawar On Suresh Kalmadi | काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ‘सुरेश कलमाडी’ यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. शरद पवार आणि कलमाडींची घट्ट मैत्री होती. शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी सुरेश कलमाडी यांनी अख्खी दिल्ली मॅनेज केली होती. मात्र त्यांचे ते स्वप्न अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही.
मागील वर्षी सुरेश कलमाडी यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं, त्यावेळी देखील शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्या दोघांची ही अखेरची भेट ठरली.
‘२४ अकबर रोड’ मधील तो गाजलेला किस्सा !
काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ‘रशीद किडवाई’ यांच्या ‘२४ अकबर रोड’ या पुस्तकात शरद पवार आणि कलमाडी यांच्या मैत्रीचा एक रंजक किस्सा नमूद आहे. १९९१ मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर जेव्हा पंतप्रधानपदासाठी नरसिंह राव, शरद पवार आणि अर्जुन सिंग यांच्यात चुरस होती, तेव्हा कलमाडी यांनी पवारांना पंतप्रधान करण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली होती.
पवारांसाठी राबवले ‘मॅनेज दिल्ली’ अभियान :
सुरेश कलमाडी हे दिल्लीत अत्यंत प्रभावशाली नेते मानले जात. त्यांनी शरद पवारांसाठी ‘मॅनेज दिल्ली’ हे विशेष अभियान राबवले होते. नव्याने निवडून आलेल्या काँग्रेस खासदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भव्य भोजनाचे (लॅव्हीश डिनर) आयोजन केले होते.
या मेजवानीला सुमारे ६४ खासदार उपस्थित होते. सुरेश कालमाडी यांच्या या कृतीने काँग्रेस पक्षासह सर्वच नेत्यांना धक्का बसला होता. त्यावेळी सोनिया गांधी राजकीय क्षेत्रात सहभागी झाल्या नव्हत्या. मात्र, त्यांनासुध्दा या घटनेनं धक्का बसला होता. नंतर अनेक नाट्यमय घडामोडींमुळे पवारांना पंतप्रधान पदाने हुलकावणी दिली, तरी मित्रासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या कलमाडींच्या मुत्सद्देगिरीची चर्चा आजही केली जाते.
क्रीडा आणि पुण्याचा विकास :
राजकारणासोबतच भारतीय क्रीडा क्षेत्रात आणि पुण्याच्या पायाभूत सोयीसुविधांच्या विकासात सुरेश कलमाडींचे मोठे योगदान राहिले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games) आणि पुण्याचे सुप्रसिद्ध ‘पुणे फेस्टिव्हल’ यांच्याशी त्यांचे नाव कायम जोडलेले राहील.
शरद पवारांची भावनिक पोस्ट :
“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी, संघर्षातून घडलेला आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता आपण गमावला आहे. भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढे राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले.
केंद्रीय मंत्री, ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया (IOA) चे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारीने काम पाहिले. पुणे फेस्टिव्हल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या माध्यमातून पुण्याला राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला,” असे शरद पवार यांनी पोस्ट करत म्हंटले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी, संघर्षातून घडलेला आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता आपण गमावला आहे.
भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढे… pic.twitter.com/yHXWfonjmc
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 6, 2026
“राजकारणात मतभेद, संघर्ष आणि टीका अपरिहार्य असतात; मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी लोकशाही मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून लोकांप्रती असलेली जबाबदारी आहे, ही भूमिका त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सातत्याने जपली. सार्वजनिक जीवनातील चढ-उतारांमधून जात असतानाही त्यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास सोडला नाही.
दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून देशाच्या समाजकारण, राजकारण आणि प्रशासकीय व्यवस्थेत आपल्या कर्तृत्वाचा व नेतृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही सर्वजण कलमाडी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ त्यांना मिळो, हिच प्रार्थना!” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.





