Sharad Pawar on Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी ‘हा’ जावईशोध कुठून लावला? शरद पवारांचा मोदींना टोला

Sharad Pawar on Narendra Modi – इंडिया आघाडीचे सरकार आल्यास 5 वर्षात 5 पंतप्रधान आणणार हा जावईशोध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठून लावला? आमच्या आघाडीत पंतप्रधानाबाबत काही चर्चा झाली नाही. त्यामुळे पंतप्रधानपदाबाबत आज आम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
पुरेसे संख्याबळ आल्यावर नेत्याची निवड केली जाईल आणि पूर्ण सहकार्य करून स्थिर सरकार देत अखंड 5 वर्ष चालवले जाईल, असे जोरदार टोला शरद पवार यांनी लगावला.
महाविकास आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापूर आणि सांगली येथे महाविकास आघाडीची प्रचार सभा पार पडली. यावेळी पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी वारंवार महाराष्ट्रात येताना दिसत आहे.
प्रचार सभेत बोलताना नरेंद्र मोदी वारंवार एक आरोप करत आहेत, तो म्हणजे इंडिया आघाडीचे सरकार आल्यास 5 वर्षांत 5 पंतप्रधान आणणार आहेत. यावर हा जावईशोध पंतप्रधान मोदींनी कुठून लावला? असा प्रतिसवाल त्यांनी केला आहे.
त्यांनी असेही स्पष्ट केले की, इंडिया आघाडीमध्ये अद्याप पंतप्रधानपदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पुरेसे संख्याबळ आल्यावर यासंदर्भात निर्णय घेऊ.
तसेच महाराष्ट्रात आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर बोलल्याशिवाय त्यांना समाधान वाटत नाही. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या, राज्यांमधल्या अनेक भागात त्या जात असत. देशातल्या गरीब लोकांची गरिबी कशी घालवायची हा विचार मांडत असत.
देशातल्या सर्वच पंतप्रधानांनी हे काम केले आहे. आत्ताचे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्रात आले की त्यांना दोन लोकांची आठवण होते. एक उद्धव ठाकरे दुसरे शरद पवार. आम्हा दोघांवर टीका केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसवत नाही, असा टोलाही त्यांनी लगाविला.





