Sharad Pawar | काश्मीर देशाचा अविभाज्य भागच राहणार – शरद पवार यांची ठाम भूमिका

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शेजारी देशांनी काहीही केले, तरी काश्मिरी जनता त्यांना कधीच साथ देणार नाही. काश्मिरी जनतेचे देशसेवेत मोठे योगदान आहे. कुणी कितीही अराजक माजवण्याचा प्रयत्न केला, तरी काश्मीर आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि सदैव राहील, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.काश्मीरमधील ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ विजय दुर्गाप्रसाद धर यांच्या नावाने सरहद ग्लोबल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज संस्थेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या विजय धर ॲम्फी थिएटरच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
सरहद संस्थेच्या कात्रज परिसरातील गुजरवाडी येथील शैक्षणिक संकुलात हा कार्यक्रम झाला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विजय धर, त्यांच्या पत्नी कविता धर, कन्या कनिका धर, सरहद संस्थेचे संजय नहार, प्राचार्य सुषमा नहार, संतसिंग मोखा, विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, विश्वस्त शैलेश वाडेकर, आर्किटेक्ट इम्रान शेख, वसंत मोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुण्याने देशाला नवा मार्ग दाखवण्याचे कार्य केले आहे. पुणे हे शिक्षण, उद्योग, संस्कृती, आयटी अशा अनेक क्षेत्रांतील आदर्श शहर आहे, असेही पवार यांनी नमूद केले.
काश्मीरमधील परिस्थिती बराच काळ अस्थिर, अशांत आणि चिंताजनक होती. त्यामुळे शिक्षणक्षेत्राची हानी झाली होती; पण विजय धर, तसेच सरहदसारख्या संस्थांनी सामाजिक दायित्व जाणून या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.मान्यवरांचे स्वागत संतसिंग मोखा, वसंत मोरे, डॉ. शैलेश पगारिया यांनी केले. गुजरवाडी शैक्षणिक संकुलासाठी कार्य करणाऱ्या सहकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी केले. आभार लेशपाल जवळगे यांनी मानले.





