Satara | जिल्ह्यात भाजपचे मुख्य टार्गेट शरद पवारच

सातारा, {श्रीकांत कात्रे} – राज्यात विधानसभा निवडणूक घोषित झाल्यावर जिल्ह्यातील आठही मतदारसंघातील हालचाली वाढणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाला शह देण्यासाठी विशेषतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांना टार्गेट करण्यासाठी भारतीय जनता पक्ष निकराने लढाई करेल अशी शक्यता आहे. त्यादृष्टीने भाजप पूर्ण तयारी करत असल्याचे चित्र आहे.
आता गावागावांतील राजकारण गतीमान होणार असून तयारी केलेले इच्छुक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करत आहेत.
जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमधील राजकीय चित्र अद्याप पूर्णतः स्पष्ट झाले नसले तरी काही जणांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांच्या प्रचाराला दिशा मिळाली आहे.
उमेदवारी मिळणार या विश्वासाने काही जण कामाला लागले आहेत. तर उमेदवारी मिळो न मिळो लढण्याचा इरादा ठेवून काही जण रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.
आता उदंड जाहले पक्ष आणि सत्तातूर ती आघाडी नि युती. कधी नव्हे अशी स्थिती राज्याच्या राजकारणात निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातही वेगळी परिस्थिती नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्ष, भाजप, शिवसेना (शिंदे), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), प्रहार संघटना व इतर बहुतेक सर्व पक्ष कोणत्या ना कोणत्या मतदारसंघात आपल्या ताकदीची चाचपणी करतील, अशी शक्यता आहे.
त्यातही प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीतील घटक पक्ष वेगवेगळ्या मतदारसंघात लढत देतील अशी शक्यता आहे. या सर्वांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे जिल्ह्यातील वर्चस्व संपवून जिल्ह्याच्या राजकारणात मुसंडी मारण्यासाठी भाजपने मोठी तयारी केली आहे.
त्यादृष्टीने शरद पवार यांना टार्गेट करुन घटक पक्षांपेक्षाही आपले अस्तित्त्व वाढविण्यासाठी भाजपचे डावपेच रंगणार आहेत.
महायुतीचे सध्याचे चित्र लक्षात घेतले तर सातारा, वाई, माण, कराड उत्तर, कराड दक्षिण या जागा भाजपच्या आहेत. फलटण, कोरेगाव व पाटण या जागा शिवसेनेकडे आहेत.
यापैकी वाई व फलटणची जागा भाजपकडून अजित पवार यांना मिळू शकते. कोरेगाव व पाटण शिवसेना शिंदे गटाकडे जाईल. सातारा, माण आणि कराड दक्षिण व उत्तर दोन्ही जागा अशा भाजपच्या चार जागा राखल्या जाऊ शकतात.
महाविकास आघाडीकडील चित्र लक्षात घेतले तर काँग्रेसची एकमेव कराड दक्षिणची जागा आहे. तिथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारी निश्चित आहे. उर्वरित सातही जागांवर कोरेगाव, कराड उत्तर, पाटण, वाई, फलटण, माण, सातारा या जागांवर शरद पवार यांचा दावा असणार आहे.
कारण गेल्या बहुतेक निवडणुकांमध्ये या जागांवर याच पक्षाच्या उमेदवारांनी लढत दिली होती. आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहब ठाकरे पक्ष काही जागांवर दावा करु शकतील. परंतु, आठपैकी कोणत्याच मतदारसंघात त्यांना उमेदवारी मिळू शकते, याची शाश्वती नाही.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाला शह देण्याचा महायुतीचा प्रयत्न राहिल. त्यातही प्रामुख्याने भाजप पूर्ण ताकद पणाला लावेल. सातारा, कराड उत्तर, माण आणि कराड दक्षिण या चार मतदारसंघात आपले उमेदवार निवडून आणण्याचा भाजपचा आटोकाट प्रयत्न राहिल.
तर वाई व फलटणमधून अजित पवार यांच्या उमेदवारांना व पाटण, कोरेगावमधून शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांना भाजप ताकद देईल. त्यासाठी जिल्ह्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे वरिष्ठ पातळीवरील अनेक नेते खास लक्ष देण्याची शक्यता आहे.
तसेच खासदार उदयनराजे भोसले यांनाही स्टार प्रचारक म्हणून या निवडणुकीत अधिक फोकस करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.
भाजपने कितीही आणि कसेही डावपेच केले तरी जिल्ह्यात शरद पवार यांना मानणारे लोक अजूनही आहेतच आणि निवडणुकीच्या काळात शांत राहून शरद पवार कोणकोणत्या खेळ्या खेळणार आहेत हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे. त्यामुळे टार्गेट शरद पवार असले तरी भाजपला त्यासाठी जंग जंग पछाडावे लागेल हे निश्चित आहे.
निवडणूक रिंगणात हे असणारच…
निवडणुका जाहीर झाल्यावर हालचाली सुरु झाल्या तरीही अजून आठपैकी कोणत्याच मतदारसंघातील चित्र स्पष्ट नाही. जागावाटप आणि इतर सोपस्कार प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवार निश्चिती होण्याची शक्यता नाही.
पक्षीय वाटाघाटी काहीही झाल्या तरी निवडणुकीच्या रिंगणात काही जणांची उमेदवार निश्चित मानण्यात येते. त्यात प्रामुख्याने शिवेंद्रसिंहराजे भोसले, दीपक पवार,
अमित कदम (सातारा), शशिकांत शिंदे, महेश शिंदे (कोरेगाव), जयकुमार गोरे, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, शेखर गोरे (माण), दीपक चव्हाण, सचिन कांबळे पाटील (फलटण),
मकरंद पाटील, मदन भोसले, विराज शिंदे, पुरुषोत्तम जाधव, ॲड. निलेश डेरे (वाई), पृथ्वीराज चव्हाण, डॉ. अतुल भोसले,
उदय सिंह पाटील उंडाळकर (कराड दक्षिण), बाळासाहेब पाटील, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ (कराड उत्तर), शंभूराज देसाई, सत्यजितसिंह पाटणकर. यांच्याशिवाय आणखी काही जण निवडणुकीच्या रिंगणात पक्षाकडून किंवा अपक्ष उमेदवारी दाखल करु शकतात.





