मुंबई : पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यासोबतच, शरद पवार गटाचे माजी खासदार वसंतराव मोरे यांचे पुत्र व जळगाव दूध संघाचे संचालक पराग मोरे, रोहन मोरे, नाना महाजन, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष अशोक वाणी, पारोळा बाजार समितीचे संचालक नागराज पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सोमनाथ देशमुख आदींनीही भाजपात जाहीर प्रवेश केला. मुंबईतील प्रदेश भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची संघटना आणखी बळकट होईल असा विश्वास आहे, असे यावेळी बावनकुळे म्हणाले. यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जे जे आमच्यावर विश्वास ठेवून पक्षात येतील, त्यांचा मान-सन्मान भाजप राखेल. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माझ्यासह पक्षातील नेत्यांना कधीही संपर्क साधू शकता. आता मी प्रदेशाध्यक्ष असलो तरी लवकरच रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदी असतील, असे यावेळी बावनकुळे म्हणाले. जळगावातील राजकीय समीकरण बदलणार? जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि माजी मंत्री सतीश पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दिलीप वाघ हे देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हुलकावणी देत दिलीप वाघ हे भाजपच्या गळाला लागले असून दिलीप वाघ यांच्या भाजप प्रवेशामुळे पाचोरा भडगाव मतदार संघातील राजकीय सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्जतचे ११ नगरसेवक भाजपमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील आणि काँग्रेसच्या ११ नगरसेवकांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे कर्जत-जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार गट पूर्णपणे मोकळा झाला आहे. कामगार संघटनेतील कार्यकर्ते भाजपमध्ये शिवसेना (ठाकरे) प्रणीत अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या सदस्य कंपन्यांच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी देखील भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. कर्मचारी संघ कार्याध्यक्ष जितेंद्र राऊत, कर्मचारी संघ सरचिटणीस सुहास माटे यांच्यासह योगेश आवळे, निशांत गायकवाड, विनोद घोगले, प्रशांत वर्तक, हर्षित तासकर, दिनेश शेवाळे, करण कांबळे, धनंजय कांबळे आदींचा यात समावेश आहे. याच कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.