पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाला धक्का? अजित गव्हाणेंच्या स्वगृही परतण्याच्या चर्चांना उधाण

Ajit Gawhane : पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष राहिलेले अजित गव्हाणे स्वगृही म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दोनच दिवसांपूर्वी गव्हाणे यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे अजित गव्हाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
शहरातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. टीपी स्कीम संदर्भात अजित दादांसोबत चर्चा केली असल्याचे स्पष्टीकरण गव्हाणे यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे. मात्र, पक्ष प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पुढे योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे देखील ते म्हणाले आहेत. यामुळे अजित गव्हाणे काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.
गव्हाणे हे पूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होते. अजित पवार यांच्या पक्षाकडून त्यांना भोसरी विधानसभेचे तिकीट नाकारल्याने तसेच ही जागा भाजपला सूटल्याने त्यांनी २५ नगरसेवकांसह शरद पवार गटात पक्षप्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शरद पवार गटाकडून भोसरी विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र, ते पराभूत झाले. या विधानसभा क्षेत्रातून भाजपचे महेश लांडगे हे पुन्हा एकदा विजयी झाले. त्यानंतर काही काळ गव्हाणे शांते होते, दरम्यानच्या काळात त्यांना शिंदेसेनेत प्रवेश करण्याची अॅाफर मिळाली होती, अशी देखील एक चर्चा होती.
…तर फटका बसण्याची शक्यता
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित गव्हाणे यांनी त्यांच्या समर्थक नगरसेवकांना घेऊन शरद पवार गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास याचा मोठा फटका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला बसू शकतो. याच पार्श्वभूमीवर शरद पवार 17 जून रोजी स्वतः पिंपरी चिंचवडमध्ये येणार आहेत. या दौऱ्यात ते स्थानिक पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यात काय होते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





