शरद पवार पावसात भिजले पण न्युमोनिया मात्र भाजपला झाला, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना उद्देशून हा निशाणा त्यांनी साधला आहे. गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यामध्ये त्यांनी साताऱ्यात पावसात भिजूनही तुम्हाला 54 च्या वर जाता आले नाही आणि ती संख्या कायम ठेवण्यासाठी वारंवार ‘तुम्ही घाबरु नका, काळजी करु नका’ असे सांगावे लागत आहे. असे पडळकर म्हणाले होते. त्याला प्रत्युत्तर राष्ट्रवादीकडून आज देण्यात आले आहे. महेश तपासे म्हणाले की, गोपीचंद पडळकर उठसूठ शरद पवार यांच्याविषयी वक्तव्य करत असतात. भाजपला महाराष्ट्रात सत्ता काबीज करता आली नाही, हे त्यांचे दुःख आम्ही समजू शकतो. साताऱ्यातील पावसाळी सभेत शरद पवार यांनी जनतेला आवाहन केले होते आणि त्याला महाराष्ट्रातल्या तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे गोपीचंद पडळकर विसरले असावेत. म्हणून ते सतत त्यांच्यावर टीका करत असतात. शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर यांना प्रसिद्धी मिळत नाही हे त्यांनाही कळून चुकले आहे. ते अक्षरश: रोज पवारांवर आणि राष्ट्रवादीवर टीका करतच असतात. वारंवार शरद पवार यांचे नाव घेऊन प्रसिद्धी मिळविण्याची त्यांची धडपड सुरू आहे. असेही ते म्हणाले आहेत.