Sharad Pawar | Devendra Fadnavis – शरद पवारांनाच भाजपसोबत युती करायची होती. तीनवेळा त्यांनी त्यासंदर्भातला निर्णय घेतला आणि नंतर तो फिरवला. आता मला असे वाटते की शरद पवार हे नेहमी अजित पवारांना पुढे करायचे आणि त्यांना व्हिलन बनवत होते, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत महायुतीची संगत घेतली. अजित पवार यांनी महायुतीसोबत येण्याचा प्रयत्न यापूर्वी केला. परंतु तो यशस्वी झाला नव्हता. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि भाजपाच्या युतीची चर्चा आणि अजित पवार यांच्यासंदर्भात गौप्यस्फोट केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले तो काळ 2009 ते 2012 या वर्षांमधला होता. त्यावेळी ते राज्यात मंत्री होते. मी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात आली. तपासात मी केलेले आरोप खरे असल्याचेही समोर आले. त्यानंतर भ्रष्टाचार करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले. काहींना शिक्षा झाली तर काहींना बडतर्फ करण्यात आले. अजित पवार हे तेव्हा त्या विभागाचे प्रमुख होते. मात्र, संपूर्ण तपासात त्यांचा थेट संबंध आढळून आला नाही. त्यामुळे त्यांचे नाव आरोपपत्रात नव्हते. हे प्रकरण 2012 चं आहे. अजित पवार हे आमच्याबरोबर आत्ता आले आहेत, असं फडणवीस म्हणाले.