Sharad Pawar Ajit Pawar : पवार काका-पुतण्यांची पुन्हा भेट; दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा जोर

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे वेगवेगळ्या बैठकांच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. रविवारी साखर संकुल येथे काका-पुतणे एका बैठकीसाठी पुन्हा एकत्र आले होते. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
पुण्यातील साखर संकुल हे शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठकीचे केंद्रबिंदू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गेल्या दोन महिन्यांत पवार काका-पुतणे दुसऱ्यांदा येथे भेटले आहेत. या वेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे आदी उपस्थित होते.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एआय तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये कशा पद्धतीने वापर करता येऊ शकतो, यासाठी या बैठकीचे आयोजन केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मार्च महिन्यात रयत शिक्षण संस्थेची बैठक, त्यानंतर जय पवार यांच्या साखरपुड्यानिमित काका-पुतणे एकत्र आले होते. एप्रिल महिन्यातच पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एआय तंत्रज्ञानासंदर्भातील बैठकीनिमित्त शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले होते.
रविवारी पुन्हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्ताने हे काका पुतणे पुन्हा एकत्र आले होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विधान करून शरद पवार यांनी या चर्चेला तोंड फोडले होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी विलिनीकरणाबाबत आपणाला कल्पना नसल्याचेही स्पष्ट केले होते. त्यातच आज पुन्हा त्यांची भेट झाल्याने लवकरच म्हणजे १० जूनपूर्वी विलीनीकरणाबाबत काहीतरी ऐकावयास मिळेल अशी चर्चा आहे. १० जून हा राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन आहे.





