काका-पुतणे एकत्र येणार? शरद पवार-अजित पवारांची १० दिवसात तिसऱ्यांदा भेट; चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर सार्वजनिक व्यासपीठावर एकत्रित येण्यास टाळाटाळ करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काका-पुतणे मागील काही दिवसांपासून मात्र विविध कार्यक्रम, बैठकांच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येताना दिसत आहेत. या भेटीमुळे आगामी घडामोडींबाबत तर्कवितर्क आणि अंदाज वाढले आहेत.
आता २१ एप्रिलला शेतीमधील एआय तंत्रज्ञानाच्या वापरासंबधी चर्चा करण्यासाठी पुण्यातील साखर संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस ते एकत्र येणार आहेत. अशा प्रकारे व्यासपीठावर एकत्र येण्याची ही त्यांची तिसरी वेळ असणार आहे. दहा दिवसांच्या कालावधीत या तीन भेटी होत आहेत. त्यामुळे या भेटींना राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. “दोन्ही नेते पुन्हा एकत्र येणार का?” असा प्रश्नही आता विचारला जात आहे.
गेल्या काही दिवसांत शरद पवार आणि अजित पवार हे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने वारंवार एकत्र येताना दिसत आहेत. याआधी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत आणि त्यानंतर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र आले होते.
मूळ राष्ट्रवादी पक्षाची दोन शकले झाली असली तरी दोन्ही राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांकडून शरद पवार हेच आपले दैवत असल्याचा दावा केला जात आहे. पक्षफुटीनंतर परस्पराची सावलीही टाळणारे दोन्ही राष्ट्रवादीतील नेते आता सार्वजनिक व्यासपीठावर एकत्र दिसू लागल्याने एकत्र येण्याच्या राजकीय वर्तुळातील चर्चा आणखी वाढल्या आहेत.
अजित पवारांच्या स्वागतासाठी रोहित पवारांची बॅनरबाजी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज जामखेड दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या स्वागतासाठी जामखेडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमध्ये रोहित पवार मित्र परिवाराकडून अजित पवार यांचे स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरबाजीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
एकीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या वारंवार कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीगाठी होत असतानाच दुसरीकडे रोहित पवारांच्या नावे अजित पवारांच्या स्वागताच्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. जामखेडमध्ये नेमकं घडतंय काय? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.




