Sharad Kapoor Health : शरद कपूरचा फोन बंद, भेटीगाठीही थांबवल्या; डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला, मैत्रिणीने व्हिडिओ केला शेअर
Sharad Kapoor Health : शरद कपूरची मैत्रीण आणि प्राणी कल्याण कार्यकर्त्या हेमा चौधरी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याच्या प्रकृतीची माहिती दिली.

Sharad Kapoor Health : बॉलिवूड अभिनेता शरद कपूर सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. शाहरुख खानसोबत ‘जोश’ या चित्रपटात झळकलेल्या शरद कपूरने काही दिवसांपूर्वी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांकडे काम आणि मदतीसाठी आवाहन केले होते. आता त्याच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शरदवर वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
शरद कपूरची मैत्रीण आणि प्राणी कल्याण कार्यकर्त्या हेमा चौधरी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याच्या प्रकृतीची माहिती दिली. शरदच्या विविध वैद्यकीय चाचण्या सुरू असून, काही चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत, तर काही अहवाल येणे बाकी आहे. सर्व अहवालांचा अभ्यास केल्यानंतर डॉक्टर पुढील उपचारांची दिशा ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेमा चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, “गेल्या काही दिवसांपासून शरद कपूरला भेटण्यासाठी आणि त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी, चित्रपटसृष्टीतील व्यक्ती तसेच चाहते प्रयत्न करत आहेत. मात्र, अचानक वाढलेल्या या संपर्कामुळे शरद काहीसा अस्वस्थ झाला आहे. गेल्या जवळपास दोन वर्षांपासून तो फारसा लोकांमध्ये मिसळत नव्हता. त्यामुळे सतत येणारे फोन आणि संभाषणांचा त्याच्यावर ताण येत आहे.”
डॉक्टरांनी शरदला किमान एक आठवडा मोबाईल फोनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सध्या त्याचा फोन बंद ठेवण्यात आला असून तो हेमा चौधरी यांच्याकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कामासाठी केलेल्या आवाहनानंतर चर्चेत
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद कपूरने चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार आणि सहकाऱ्यांकडे काम मिळवून देण्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. आर्थिक मदतीपेक्षा आपल्याला कामाची संधी आणि लोकांच्या पाठिंब्याची अधिक गरज असल्याचे त्याने म्हटले होते. यावेळी त्याने आपल्या कठीण परिस्थितीचा आणि मानसिक तणावाचाही उल्लेख केला होता.
शरद कपूरने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. ‘जोश’ चित्रपटात त्याने शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर केली होती. याशिवाय ‘दस्तक’, ‘लक्ष्य’, ‘एलओसी कारगिल’, ‘जानी दुश्मय एक अनोखी कहानी’ यांसारख्या चित्रपटांमधील आपल्या कामातून त्याने प्रेक्षकांची पसंती मिळवली.






