रस्त्यावर मागते भीक.. बस स्थानक झालं घर ! एकेकाळची लावणी सम्राज्ञी जगतेय हलाखीचे जीवन

शिर्डी – एकेकाळची लावणी सम्राज्ञी.. जिच्या अदाकारीने लालबाग परळचे हनुमान थिएटर वन्स मोअर, टाळ्या आणि शिट्यांनी गाजले. जिच्या अदाकारीने आणि सौंदर्याने चाळीस वर्षांपूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केले. ती महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी आता मात्र रस्त्यावर भीक मागत आहे. बस स्थानकच तिचे घर झाले असून अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे.
शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर. एकेकाळी याच शांताबाईच्या लावणी नृत्याने उत्तर महाराष्ट्र गाजवला. लालबाग परळचे हनुमान थिएटर गाजवले. त्यांची कला, सौंदर्य आणि लोकप्रियता पाहून 40 वर्षांपूर्वी कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तार भाई यांनी “शांताबाई कोपरगावकर’ हा तमाशा काढला.
शांताबाई मालक झाल्या आणि पन्नास-साठ लोकांचे पोट भरू लागल्या. यात्रे-जत्रेत तमाशा प्रसिद्ध झाला. बक्कळ पैसा मिळू लागला. मालक आहोत या तोऱ्यात अशिक्षित शांताबाईची फसवणूक झाली. अत्तार भाईंनी सर्व तमाशा विकून टाकला आणि शांताबाईंचे जीवन उद्ध्वस्त झाले. त्यांना मानसिक आजाराने ग्रासले. पती नाही, ना कुणी जवळचे नातेवाईक. कोपरगाव बसस्थानकच शांताबाईचे घर झाले.
शांताबाईचे वय आज 75 वर्षे आहे. मात्र विस्कटलेले केस, फाटकी साडी, सोबत कपड्यांचे बाजके अशा अवस्थेतील शांताबाई बस स्थानकावर आजही “ओळख जुनी धरून मनी” ही लावणी गात बसलेली असते. शांताबाईची लकब, अदाकारी, हातांची फिरकी आणि डोळ्यांची भिरकी बघून कुणीतरी तिचा व्हिडीओ बनवून सोशल माध्यमांवर टाकला.
खान्देश भागातील काही तमाशा कलावंतांनी हा व्हिडीओ बघितला आणि कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना पाठवला. खरात यांनी 2 दिवस शांताबाईचा शोध घेतला आणि अखेर त्या कोपरगाव बसस्थानकात आढळून आल्या. अरुण खरात आणि त्यांचे मित्र डॉ. अशोक गावीत्रे यांनी त्यांना वैद्यकीय मदत केली.

