ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या ४३व्या वर्धापनदिनाच्या मुहूर्तावर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर २५ लाख रुपयांच्या लाचखोरीचा गंभीर आरोप झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले आणि आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्यांना सेवेतून निलंबित केले आहे. हे प्रकरण ठाणे महापालिकेच्या प्रतिमेला कलंक लावणारे असून, काँग्रेससह विरोधी पक्षांनी “भ्रष्टाचाराचा गड” म्हणून टीका सुरू केली आहे. पाटोळे यांच्या निलंबनानंतर त्यांचा कार्यभार उपायुक्त उमेश बिरारी यांच्याकडे सोपवण्यात आला असून, नव्याने रुजू झालेले दीपक झिजांड यांच्याकडे नौपाडा-कोपरी व वागळे प्रभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता नव्या अधिकाऱ्यांवर अतिक्रमण विभागाची प्रतिष्ठा वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. ठाणे महापालिकेच्या वर्धापनदिनाच्या (१ ऑक्टोबर) सायंकाळी घोडबंदर रोडवरील अभिराज डेव्हलपर्सच्या एका साइटवरील अनधिकृत बांधकाम (अतिक्रमण) हटविण्यासाठी बिल्डर अभिजीत कदम यांनी उपायुक्त शंकर पाटोळे यांच्याकडे विनंती केली होती. मात्र, पाटोळे यांनी यासाठी २५ लाख रुपयांची लाच मागितली असा आरोप आहे. ACB ने मुख्यालयात सापळा रचून पाटोळे यांना १५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. चौकशीत समोर आले की, यापूर्वीच त्यांनी १० लाख रुपये घेतले होते, ज्यामुळे एकूण रक्कम २५ लाखांपर्यंत गेली. या कारवाईत पाटोळे यांच्यासह महापालिकेतील डेटा ऑपरेटर ओमकार गायकर आणि सुशांत सुर्वे यांनाही अटक करण्यात आली. सुर्वे याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली गेली असून, नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ACB ने ठाणे एसीबीकडे प्रकरण वर्ग केले असून, पाटोळे यांच्या चौकशीसाठी विशेष पथक नेमले आहे.