Shankar Jagtap : कचऱ्याच्या समस्येवरुन आमदार जगतापांनी महापालिका अधिकाऱ्यांना धरले धारेवर
Shankar Jagtap : शहराची स्वच्छता ही केवळ महापालिकेची नियमित जबाबदारी नसून नागरिकांच्या आरोग्याशी निगडित बाब

पिंपरी – सध्या शहरात कचऱ्याची समस्या तीव्र होत असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी अचानक महापालिकेला भेट दिली. शहरातील कचरा व्यवस्थापनाचा आढावा घेत त्यांनी अधिकाऱ्यांना कारणे नका सांगू, उपाययोजना करा, अशा शब्दांत सुनावले.
मोशी येथील कचरा प्रकल्पातील दुर्घटनेनंतर कचरा संकलन आणि वाहतुकीच्या व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे चित्र शहरातील काही भागांत दिसत आहे. अनेक ठिकाणी कचरा वेळेत उचलला जात नसल्याने रस्त्यांच्या कडेला आणि कचराकुंड्यांजवळ कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. आमदार जगताप यांनी महापालिकेत अचानक भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
शहरातील विविध भागांतील स्वच्छतेच्या सद्यस्थितीची माहिती घेत त्यांनी कचरा संकलनातील त्रुटी आणि नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष वेधले. काही वर्षांपूर्वी स्वच्छतेच्या बाबतीत पिंपरी-चिंचवड शहराने चांगली कामगिरी केली होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत अनेक भागांत स्वच्छतेबाबत कमतरता जाणवत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
कचरा व्यवस्थापनातील अडचणींचे कारण पुढे करून जबाबदारी झटकण्याऐवजी अधिकाऱ्यांनी समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका आमदार जगताप यांनी मांडली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून आढावा घेण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करावी आणि स्वच्छतेच्या कामावर लक्ष ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील प्रत्येक भागात नियमित कचरा संकलन, वेळेत वाहतूक आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. कोणत्याही नागरिकाला कचऱ्यामुळे त्रास होता कामा नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जगताप यांनी दिला.
शहराची स्वच्छता ही केवळ महापालिकेची नियमित जबाबदारी नसून नागरिकांच्या आरोग्याशी निगडित बाब आहे. प्रत्येक नागरिकांनी स्वच्छतेसाठी आग्रही राहून स्वतः आपला परिसर, शहर स्वच्छतेसाठी आग्रही रहावे, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले.





