Satara | शंभूराज देसाई, महेश शिंदे व मकरंद पाटील पुन्हा रिंगणात

सातारा, (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मंगळवारी जाहीर केलेल्या पहिल्या 45 उमेदवारांची यादीत गुवाहाटी बंडात सामील झालेल्या सर्व आमदारांवर त्यांनी विश्वास दाखवला आहे.
जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातून आमदार शंभूराज देसाई व कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार महेश शिंदे यांची वर्णी लागली आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पन्नास उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये वाई मतदारसंघातून मकरंद पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळवून पुन्हा सत्ता स्थापन करायची, या हेतूने महायुतीतील तिन्ही घटक पक्ष वेगाने कामाला लागले आहेत.
यामध्ये भारतीय जनता पक्षाने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पहिली यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली.
या मध्ये 45 आमदारांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या सत्तांतर नाट्यामध्ये एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या सर्व आमदारांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले आहे
उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना पाटण विधानसभा मतदारसंघातून तर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांना कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून पुन्हा संधी मिळाली आहे.
त्यामुळे पाटण तालुक्यात देसाई विरुद्ध पाटणकर अशी पारंपरिक लढत होणार आहे. तर कोरेगाव मतदारसंघांमध्ये महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे यांच्यातच अटीतटीचा सामना रंगणार का हे शशिकांत शिंदे यांची मेदवार जाहीर झाल्यावर स्पष्ट होईल.
पाटण व कोरेगाव मतदार संघात शिंदे गट प्रभावी राहिला आहे त्यामुळे येथील लढत रंगतदार होणार आहे. शिंदे गटाने जिल्ह्यातील दोन मतदारसंघ सोडून अन्य सहा मतदारसंघात ताकद वाढवण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत.
त्यामुळे नेते सोडले तर सर्वसामान्य शिवसैनिक अस्वस्थ आहे. जावळीमध्ये विद्यमान आमदार युतीधर्म पाळत नाहीत म्हणून येथील शिंदे गटाने वेगळा पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे.
तर कोरेगाव व पाटण मतदारसंघातही युतीधर्म पाळला जात नसल्याने शिंदे गटाचे शिवसैनिक अस्वस्थ आहेत. एकनाथ शिंदे यांचे साताऱ्यातील विश्वासू निलेश मोरे यांनी एका पत्राद्वारे या अस्वस्थ भावनांना वाचा फोडली आहे. त्यामुळे शिंदे गटात ऑल इज नॉट वेल असे सध्या जाणवत आहे.
महायुतीचा दुसरा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी महायुतीकडून पहिली यादी जाहीर केली. त्यात वाई विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मकरंद पाटील यांना संधी दिली आहे. आमदारकीचा चौकार मारण्यासाठी मकरंद पाटील सज्ज झाले आहेत.
फलटण विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी दीपक चव्हाण यांची उमेदवारी अजित पवार यांनी जाहीर केली होती.
मात्र, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर वगळता यांचा संपूर्ण गट राष्ट्रवाही काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षात सामील झाला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी हा मतदारसंघ मागे ठेवला आहे. तो अजित पवार यांच्याकडे राहणार की भाजपकडे जाणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.





