“शकुनी मामा’ गेला.! अभिनेते गुफी पेंटल यांचे निधन

मुंबई – दूरदर्शनवरील संस्मरणीय अशा महाभारत मालिकेत शकुनी मामाची लक्षवेधी भूमिका करणारे अभिनेते गुफी पेंटल यांचे दीर्घ आजाराने येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. सुप्रसिद्ध अभिनेत्री टीना घई यांनी या बातमीला दुजोरा दिला असल्याने संपूर्ण सिनेजगतात शोककळा पसरली आहे. कालच सुलोचना दीदींसारख्या दिग्गज अभिनेत्रीने एक्झिट घेतली आणि आज पेंटल हे जग सोडून गेले.
बीआर चोप्रा यांच्या प्रसिद्ध महाभारतला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या शोमधील प्रत्येक पात्राने चाहत्यांच्या हृदयात खूप महत्त्वाचे स्थान निर्माण केले होते. या कलाकारांमध्ये गुफी पेंटलच्या नावाचाही समावेश आहे. गुफी पेंटल यांनी या शोमध्ये शकुनी मामाची भूमिका साकारली होती. आजही जेव्हा जेव्हा शकुनी मामाच्या अभिनयाची चर्चा होते तेव्हा त्यामध्ये गुफी पेंटलचे नाव घेतले जाते. रथी-महारथी अभिनेत्यांची मांदियाळी असलेल्या त्या मालिकेत पेंटल यांनीही आपला ठसा उमटवला होता.
पेंटल यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होत होती. दरम्यान, गुफी पेंटलचा पुतण्या हितेन यांनी सांगितले की, वृद्धापकाळानुसार अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या गुफी पेंटल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गूफी पेंटल यांच्या अखेरच्या प्रवासात सिनेविश्वातील अनेक दिग्गज आणि मोठे स्टार्स त्यांच्यासोबत सामील झाले होते. पेंटल यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, 1980 च्या दशकात हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त ते काही टीव्ही मालिकांमध्ये दिसले होते.
अभिनयाच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी ते इंजिनियर होते. वर्ष 1975 मध्ये “रफू चक्कर’ या सिनेमाद्वारे त्यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. “अकबर बिरबल’, “सीआयडी’, “राधा कृष्णा’ या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले. त्यांनी कास्टिंग दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे. स्टार प्लस वाहिनीवरील कन्हैया लाल ही त्यांची शेवटची मालिका ठरली.





