Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या या महामार्गासाठी सरकारने तब्बल 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. पण आता शेतकऱ्यांनी या महामार्गाला कडाडून विरोध सुरू केला आहे. नांदेड येथील शेतकऱ्यांनी सरकारच्या यासंबंधीच्या आदेशाची होळी केली असून, सांगली येथील शेतकऱ्यांनीही महामार्गाची मोजणी बंद पाडली आहे. शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर व गोवा या दोन शहरांना जोडणार आहे.
हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभी, बीड, लातूर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग मार्गे गोव्यापर्यंत जाणार आहे. पण या महामार्गात अनेक सुपीक जमिनी जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या महामार्गाला कडाडून विरोध केला आहे. परिणामी, सरकार व शेतकरी यांच्यात या मुद्यावरून तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे. नांदेडच्या मालेगाव येथे शेतकऱ्यांनी या महामार्गाविषयी काढलेल्या आदेशाची होळी केली आहे.
या आंदोलनात नांदेड, परभणी व हिंगोली येथील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. काही मोजक्याच लोकांच्या हितासाठी हा मार्ग शेतकऱ्यांवर लादण्यात येत आहे. या प्रकल्पात हजारो कोटींचा भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे आम्ही हा महामार्ग कोणत्याही स्थितीत होऊ देणार नाही, असा दावा आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.
सांगलीच्या शेटफळे येथे मोजणी पाडली बंद
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम रोखून धरले आहे. शक्तिपीठ महामार्गात शेटफळे गावातील 429 शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. या प्रकरणी 40 हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित होणार आहे. महसूल विभागाने भूसंपादनासाठी केवळ एक दिवस अगोदर म्हणजे मंगळवारी शेतकऱ्यांना नोटीसा पाठवल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज बुधवारी थेट अधिकारी आपल्या सामानासह मोजणीसाठी पोहोचले होते.





