बारामती (प्रतिनिधी) । बारामतीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शक्ती अभियान राबवणार आहे. शक्ती अभियानांतर्गत शहरातील विविध भागात शक्ती बॉक्स ठेवण्यात येणार आहेत. शक्ती बॉक्सच्या माध्यमातून नागरिकांना पोलिसांना काही माहिती द्यायची असेल तसेच तक्रार आसेल तर शक्ती बॉक्स म्हणजेच तक्रार पेटीत तक्रार टाकता येणार आहे. दोन दिवसात पोलीस त्या तक्रांची दखल घेतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. बारामती शहरात वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनला आहे. शहरात खून दरोडे मारामारीच्या घटना सातत्याने होत आहेत. अल्पवयीन मुलांचा यामध्ये सहभाग आहे. ही बाब गंभीर आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. गुन्हेगारी रोखण्यासाठी शक्ती अभियान प्रभावीपणे राबवणीच्या सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शहरातील शाळा, कॉलेज ,ऑफिसेस भागात शक्ती बॉक्स तक्रारपेटी ठेवण्यात येणार आहे. मुली, महिला, युवा तसेच नागरिकांच्या आलेल्या तक्रारींची दखल पोलीस दोन दिवसात घेणार आहेत. गुन्हे घडण्याआधीच तक्रार पेटी द्वारे माहिती काही मिळाली तर पोलिसांना गुन्हे रोखता येतील. तक्रार करणारेचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. शक्ती अभियानांतर्गत महिलांची सुरक्षा तसेच युवकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. शक्ती अभियानांतर्गत सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांवर देखील नजर असेल. मुलींचा पाठलाग छेडछाड तसेच चावटपणा व फोन करून त्रास देणाऱ्यांवर देखील शक्ती अभियानांतर्गत कारवाई करण्यात येईल. यासाठी तक्रार पेटीत तक्रार करणे गरजेचे आहे. बारामती शहराचा विस्तार होत आहे. पिंपरी चिंचवड नंतर पुणे जिल्ह्यात बारामती हे महत्त्वाचे शहर आहे. बारामतीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शक्ती अभियान राबवले जात आहे. शक्ती अभियानात पंच शक्ती म्हणजेच पाच प्रकारे काम होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारावरती पोलिसांची करडी नजर राहील. हे अभियान बारामतीत यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यात लागू करण्यासाठी प्रयत्न करू. याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू. असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.