Lok Sabha 2024: प्रकाश आंबेडकरांनी ‘मविआ’च्या ‘या’ उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा

मुंबई – राज्यात महाविकास आघाडीमधील जागावाटपासंदर्भात बैठकांचे सत्र सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासंदर्भात अनेक बैठकाही झाल्या. मात्र, यावर अद्यापही तोडगा निघताना दिसत नाही. अशातच आता महाविकास आघाडीने कोल्हापूर मतदारसंघातून जाहीर केलेले उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे. (Shahu Maharaj Chhatrapati supported by Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar)
पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीसोबत एकत्र लढण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. पण काँग्रेसकडून कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे कोल्हापुरात शाहू महाराजांना आमचा पाठिंबा असेल.
कारण शाहू महाराजांची विचारसरणी आणि त्यांचे कुटुंब चळवळीच्या जवळचे असल्याचे आम्ही मानतो. तिन्ही ठिकाणी निर्णय घेण्यात आला की, पक्षाच्या वतीने त्यांना आमचा पाठिंबा असेल. त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून जे प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.





