Shahu Kala Mandir: शाहू कला मंदिर कलेचे व्यासपीठ की ठेकेदारांची सोय? नाट्यगृहाच्या दुरवस्थेवरून वाद
Shahu Kala Mandir: सोशल मीडियावरील रीलमुळे सातारा पालिकेचा कारभार चव्हाट्यावर; आता दोन महिन्यांसाठी नाट्यगृह बंद ठेवून प्रशासनाकडून डागडुजीची तयारी.

Shahu Kala Mandir – सातार्याच्या कला आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानल्या जाणार्या शाहू कला मंदिराच्या वास्तूची सध्याची दुरवस्था पाहिली की, पालिका प्रशासनाला खरोखरच कला आणि संस्कृती जपायची आहे की, दुरुस्तीच्या नावाखाली ठेकेदारांची सोय करायची आहे, असा प्रश्न पडतो. अलीकडेच एका व्यावसायिक नाटकाच्या चमूने समाजमाध्यमांवर रील तयार करून, शाहू कला मंदिरातील गैरसोयी आणि दुरवस्थेकडे पालिका प्रशासनाचे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले.
हा प्रकार म्हणजे केवळ एका नाटकाच्या टीमने व्यक्त केलेली नाराजी नव्हती, तर रंगकर्मींच्या वेदनांचा उद्रेक होता. शाहू कला मंदिरातील समस्यांची यादी मोठी आहे. रंगमंचाचा पडदा न उघडणे, ध्वनिव्यवस्थेतील त्रुटी, रंगमंचावरील कलाकारांची सुरक्षितता, आसनव्यवस्था, स्वच्छता आणि इतर तांत्रिक सुविधांबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. मात्र, प्रत्येक वेळी किरकोळ डागडुजी करून, विषय संपवण्याचा प्रयत्न केला जातो.
व्यावसायिक कलाकारांनी पालिकेची अब्रू चव्हाट्याव मांडल्यानंतर आता नाट्यगृह दुरुस्तीसाठी दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत नाट्यगृहाची किरकोळ दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून, तात्पुरती मलमपट्टी करण्यात येणार की, आवश्यक सोयीसुविधांमध्ये मूलभूत बदल घडवून आणले जाणार, याकडे रंगकर्मी आणि नाट्यरसिकांचे लक्ष आहे. शाहू कला मंदिराच्या दुरवस्थेबाबतची ओरड काही नवीन नाही.
ज्येष्ठ अभिनेते (दिवंगत) विक्रम गोखले, प्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी काही वर्षांपूर्वी नाट्यगृहातील व्यवस्थेबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती. सातार्याचे भूमिपुत्र आणि प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनीही रंगभूमीच्या सेवाव्रताचा सन्मान राखण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतर झाले काय, तर फायली सरकल्या, बैठका झाल्या, आश्वासने मिळाली.
मात्र, परिस्थितीत बदल झाला नाही. सध्या नाट्यगृहात ठेकेदारीचे राजकारण बोकाळत चालले आहे. रंगकर्मी आणि प्रेक्षकांना सुविधा पुरवण्यापेक्षा कंत्राटांचे गणित आणि बिलांचे आकडे महत्त्वाचे ठरत आहेत. मात्र, शाहू कला मंदिर सातार्याच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असून, ठेकेदार जगवण्याची वास्तू नाही, हे रंगकर्मी आणि नाट्यरसिकांनी ठासून सांगायची वेळ आली आहे.
केवळ दुरुस्ती नव्हे, तर उत्तरदायित्व निश्चित करण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत नाट्यगृहातील दर्जाहीन कामे कोणी केली, त्यांची जबाबदारी कोणाची आणि पुढील पिढ्यांसाठी सक्षम, सुरक्षित व आधुनिक नाट्यगृह उभारण्याचा आराखडा आहे का, याची उत्तरे पालिका प्रशासनाने द्यायला हवीत, अन्यथा शाहू कला मंदिराची दुरवस्था यापुढेही होत राहील.






