Shahrukh Khan: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या दोन मोठ्या कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे त्याला ‘जवान’ चित्रपटासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार, तर दुसरीकडे मुलगा आर्यन खान दिग्दर्शक म्हणून डेब्यू करणार आहे. आर्यनची ‘बैड्स ऑफ बॉलिवूड’ ही वेब सीरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे.याच निमित्ताने शाहरुख खान, गौरी खान, आर्यन खान आणि संपूर्ण टीम मीडियासमोर आली. “नेशनल अवॉर्ड उचलायला माझा एक हात पुरेसा” अलीकडेच शाहरुखच्या खांद्याची शस्त्रक्रिया झाली असून त्याच्या हाताला पट्टी होती. त्यावर विनोदी शैलीत तो म्हणाला, “तुम्ही विचार करत असाल माझ्या हाताला काय झालं… तर मला दुखापत झाली होती आणि शस्त्रक्रिया झाली. बरे होण्यासाठी अजून दोन महिने लागतील. पण नेशनल अवॉर्ड उचलायला माझा एक हातही पुरेसा आहे.” तो पुढे हसत म्हणाला, “मी एका हाताने बरीच कामं करतो. फक्त दोन हातांशिवाय प्रेक्षकांचं भरपूर प्रेम गोळा करणं थोडं अवघड जातं.” मुलगा आर्यनसाठी भावूक झाले शाहरुख स्टेजवर आर्यनला घेऊन येताना शाहरुख एका वडिलांसारखे भावूक झाले. त्यांनी सांगितलं, “मी मुंबई, महाराष्ट्र आणि या देशाचा आभारी आहे, ज्याने मला गेल्या ३० वर्षांत प्रेक्षकांचं प्रेम दिलं. आज माझा मुलगा या पवित्र भूमीवर पहिलं पाऊल ठेवतो आहे. तो मेहनती मुलगा आहे. त्याच्या कामाला जर तुम्ही दाद दिलीत, तर त्या टाळ्यांमध्ये थोडी दुआ नक्की ठेवा. मला जितकं प्रेम दिलंय, त्याच्या दुप्पट, शंभरपट प्रेम त्याला द्या.” आर्यन म्हणाला… पहिल्यांदाच स्टेजवर येऊन आर्यन खान थोडा नर्व्हस दिसला. त्याने सांगितलं, “मी पहिल्यांदा स्टेजवर आलोय, थोडा नर्व्हस आहे. जास्त बोलणार नाही. माझं बोलणं माझा शो बोलेल.” ‘बैड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल, मोना सिंह, लक्ष्य लालवानी, सहर बांबा, आन्या सिंह, राघव जुयाल, गौतमी कपूर यांसारखे कलाकार झळकणार आहेत. तर सलमान खान, करण जोहर आणि रणवीर सिंह यांचीही खास झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.