Shah Bano: ‘हक’ चित्रपटातून शाह बानोच्या संघर्षाची कहाणी मांडणार यामी गौतम…

Shah Bano : बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम लवकरच एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. त्यांचा आगामी चित्रपट ‘हक’ हा ४० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक शाह बानो प्रकरणावर आधारित आहे. या प्रकरणाने त्या काळी देशाच्या कायदा, राजकारण आणि समाजव्यवस्थेत मोठा बदल घडवून आणला होता.
कोण होत्या शाह बानो?
शाह बानो या मध्यप्रदेशातील ६२ वर्षीय मुस्लिम महिला होत्या. १९७८ मध्ये त्यांचे पती मोहम्मद अहमद खान, जे स्वतः वकील होते, त्यांनी ४३ वर्षांच्या वैवाहिक आयुष्य आणि पाच मुलांनंतर त्यांना घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर शाह बानो यांच्याकडे जगण्याचा कोणताही आधार नव्हता. पतीनेही खर्च देण्यास नकार दिला.
यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम १२५ अंतर्गत पोटगीची मागणी केली. हे कलम सर्व नागरिकांवर लागू होते, मग धर्म कोणताही असो.
खालच्या न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत
पतीने, मुस्लिम पर्सनल लॉनुसार ‘इद्दत’ (तलाकानंतर सुमारे तीन महिने) इतक्याच काळासाठी खर्च दिला जाऊ शकतो. मात्र, खालच्या न्यायालयाने शाह बानो यांच्या बाजूने निकाल दिला. हा वाद पुढे सर्वोच्च न्यायालयात गेला आणि तो धर्मनिरपेक्ष कायदा विरुद्ध धार्मिक कायदे असा मोठा प्रश्न बनला.
१९८५ चा ऐतिहासिक निकाल
२३ एप्रिल १९८५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने शाह बानो यांच्या बाजूने निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, कलम १२५ हे सर्वांवर लागू आहे आणि पतीने घटस्फोटानंतरही पत्नीच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घ्यावी. या निर्णयात न्यायालयाने समान नागरी संहितेची (Uniform Civil Code) गरज असल्याची टिप्पणीही केली. हा निकाल महिलांच्या हक्कांसाठी मोठा टप्पा ठरला.
राजकीय वाद आणि १९८६ चा कायदा
हा निर्णय आल्यानंतर मुस्लिम संघटनांनी तीव्र विरोध केला. सरकारवर दबाव वाढला आणि १९८६ मध्ये ‘मुस्लिम महिला (तलाकावर अधिकारांचे संरक्षण) अधिनियम’ पारित करण्यात आला. या कायद्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मागे घेण्यात आला आणि मुस्लिम महिलांना केवळ ‘इद्दत’ कालावधीपुरताच भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली. यामुळे महिला हक्क कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली.
आजही सुरू आहे चर्चा
शाह बानो प्रकरण हे भारतीय न्यायव्यवस्थेतील एक ऐतिहासिक टप्पा मानले जाते. समान नागरी संहिता या विषयावर होणाऱ्या प्रत्येक चर्चेत या प्रकरणाचा उल्लेख आजही केला जातो. आता यामी गौतम मोठ्या पडद्यावर शाह बानोची भूमिका कशी साकारतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.





