Shabbir Ansari Pass Away : ओबीसींचा कणखर बुलंद आवाज हरपला; शब्बीर अन्सारी यांचं निधन
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि ओबीसी चळवळीतील प्रख्यात लढवय्या नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे (Shabbir Ansari Pass Away) आज दीर्घ आजाराने निधन झाले.

Shabbir Ansari Pass Away : ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि ओबीसी चळवळीतील प्रख्यात लढवय्या नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे (Shabbir Ansari Pass Away) आज (रविवारी) दुपारी साडेबारा वाजता जालना येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
शब्बीर अन्सारी यांनी सुरुवातीला मुस्लिम ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा दिला. नंतर त्यांनी ओबीसींच्या व्यापक चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि संपूर्ण वंचित, मागासवर्गीय समाजाच्या न्याय हक्कांसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.
मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आणि बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. नुकतेच ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनांमध्येही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती.
त्यांच्या ‘मंडलनामा’ या ग्रंथात मुस्लिम ओबीसी संघटनेचा खडतर प्रवास आणि आरक्षण लढ्याचा इतिहास मांडला आहे. हा ग्रंथ सामाजिक चळवळीचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज मानला जातो आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
अन्सारी यांच्या राहत्या घरातून आज रात्री ईशा नमाजनंतर ९ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर सय्यद अहमद शेर सवार दर्गा येथे नमाज-ए-जनाजा अदा करण्यात येईल. त्यानंतर जुना जालना येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी (अंतिम संस्कार) करण्यात येणार आहे.
छगन भुजबळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर शब्बीर अन्सारी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भुजबळ म्हणाले, “अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस आणि ऑल इंडिया ओबीसी मुस्लिम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने ओबीसी चळवळीचा बुलंद आवाज आणि लढवय्या नेता गमावला आहे.
शब्बीर अन्सारी केवळ माझे सहकारी नव्हते, तर ओबीसी चळवळीतील माझे अत्यंत विश्वासू आणि खंदे सोबती होते. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी आणि बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही गेली अनेक दशके खांद्याला खांदा लावून संघर्ष केला आहे.”
भुजबळ पुढे म्हणाले, “शब्बीरभाई यांनी जात आणि वर्ग यातील फरक अचूक ओळखून मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची कायदेशीर आणि सामाजिक मोहीम हाती घेतली होती, ती यशस्वी करून दाखवली. मुस्लिम ओबीसी समाजाला आरक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. ‘मंडलनामा’ या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले होते, ही माझ्यासाठी नेहमीच स्मरणात राहणारी बाब आहे.”
ते म्हणाले, “अन्सारी साहेबांनी मांडलेली भूमिका आणि त्यांनी दिलेला लढा हा केवळ मुस्लिमांसाठी नसून तो संपूर्ण वंचित घटकांसाठी होता. स्व. विलासराव देशमुख, शरद पवार यांच्यापासून ते युती सरकारच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना सोबत घेऊन त्यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर मार्ग काढला. त्यांच्या जाण्याने समता परिषदेची आणि माझी वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. एक सच्चा आणि लढवय्या नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अन्सारी परिवाराच्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.”






