Pune News : पुण्यात ‘एसजीजीएस आयकॉन्स मीट २०२६’ उत्साहात; देश-विदेशातील यशस्वी माजी विद्यार्थी एकवटले
Pune News : कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे माजी प्राचार्य प्रा. बी. एम. नाईक, माजी चेअरमन सुनील रायथथा, संस्थेचे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स सदस्य व वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. संजय लाटकर, सुरेश जोंधळे, अमोल महामुनी, संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे आणि कार्यक्रमाचे संयोजक डॉ. रवींद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुणे : श्री गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, नांदेड यांच्या वतीने १७ व १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यातील लेमन ट्री प्रीमियर हॉटेल येथे ‘एसजीजीएस आयकॉन्स मीट २०२६’ या दोन दिवसीय विशेष संमेलनाचे आयोजन करण्यात आले. देश-विदेशातील उद्योग, व्यवसाय, संशोधन, शिक्षण, विज्ञान, प्रशासन आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविलेल्या नामवंत माजी विद्यार्थ्यांनी या संमेलनात सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे माजी प्राचार्य प्रा. बी. एम. नाईक, माजी चेअरमन सुनील रायथथा, संस्थेचे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स सदस्य व वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. संजय लाटकर, सुरेश जोंधळे, अमोल महामुनी, संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे आणि कार्यक्रमाचे संयोजक डॉ. रवींद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या संमेलनात प्रथम ‘एसजीजीएस आयकॉन्स भाग-३’ या पुस्तकाचे प्रा. बी. एम. नाईक यांच्या हस्ते झालेले प्रकाशन. यावेळी पुस्तकाचे लेखक डॉ. रवींद्र जोशी व वनिता जोशी उपस्थित होते. या तिसऱ्या भागात ४० यशस्वी माजी विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी यशोगाथांचा समावेश असून, आतापर्यंत तीन भागांतून एकूण १०० एसजीजीएस आयकॉन्सचा प्रेरणादायी प्रवास शब्दबद्ध करण्यात आला आहे.
आयकॉन्स मीट या कार्यक्रमासाठी अमेरिकेहून आलेले उद्योजक श्रीकांत निस्ताने, सिंगापूर व इतर देशांतील आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर कार्यरत माजी विद्यार्थी विशेष उपस्थित होते. याशिवाय संस्थेचे माजी संचालक डॉ. यशवंत जोशी, डॉ. लक्ष्मण वाघमारे, सीओईपीचे कुलगुरू डॉ. सुनील भिरुड, तसेच उद्योजक व उद्योग क्षेत्रातील मान्यवर अभय देशपांडे, डॉ. राजेश ऊके, बलराम खोत, सतीश पाटील, श्री. विकास राठोड, अभिजीत केळकर, हेमंत चाफळे, श्री. राजेंद्र गोरे, संजय गाडगे आणि श्रीधर भट यांनी सहभाग घेतला.
शासकीय व प्रशासकीय क्षेत्रातून दिनेश पांगारकर, आयआरएस अधिकारी माधव सुलफुले, कामगार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी डॉ. रवींद्र धुरजड आणि मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी सरोज देशपांडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक प्रतिष्ठित अधिकारी उपस्थित होते.
दोन दिवसांच्या या संमेलनात उद्योग व उद्योजकता, कॉर्पोरेट लीडरशिप, संशोधन व शिक्षण, तसेच प्रशासकीय सेवा अशा विविध ट्रॅक्समध्ये चर्चा आयोजित करण्यात आल्या. विशेषतः इंटर्नशिप, प्लेसमेंट, स्टार्टअप व इनक्युबेशन, स्कॉलरशिप, रिसर्च कोलॅबोरेशन, सी एस आर आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या विषयांवर माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याच्या संधींवर विचारमंथन करण्यात आले.
संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांनी ‘एसजीजीएस व्हिजन २०२३५’ सादर करून संस्थेच्या भविष्यातील शैक्षणिक, संशोधन व पायाभूत विकासाची दिशा स्पष्ट केली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी आपले ज्ञान, अनुभव, उद्योगसंपर्क आणि संसाधने उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
कार्यक्रमात मान्यवर एसजीजीएस आयकॉन्स यांचा सन्मान, त्यांच्या यशोगाथांवरील व्हिडिओ प्रेझेंटेशन, पॅनल डिस्कशन, समूहचर्चा, ओपन हाऊस आणि संस्थेसाठी योगदानाच्या संधींवर विशेष सत्रे आयोजित करण्यात आली. ‘उत्कृष्टतेचा दुवा, प्रभावाची निर्मिती, एसजीजीएस नांदेडच्या भविष्याची जडणघडण’ या संकल्पनेवर आधारित हे संमेलन माजी विद्यार्थी आणि संस्थेमधील संबंध अधिक दृढ करणारे ठरले.
कार्यक्रमाचे संयोजक व ‘एसजीजीएस आयकॉन्स भाग-१,२,३’ पुस्तकांचे लेखक डॉ. रवींद्र जोशी यांनी देश-विदेशातून उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. संस्थेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांचे संघटित योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संचालक, बोर्ड ऑफ गव्हर्नर्स, आयोजन समिती, प्राध्यापक, माजी विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थी स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.





