पुणे : पुण्यातील स्वारगेट बस डेपो येथे बंद पडलेल्या बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने दोनदा अत्याचार केल्याची होती. ही घटना ताजी असतानाच शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर लग्न करण्यासाठी तगादा लावला. लग्न नाही केलं तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणीने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी २६ फेब्रुवारीला तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीवर कुठलीच कारवाई झाली नाही. आरोपी अद्यापही मोकाट आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा मागे घ्यावा यासाठी आरोपी तरुणीवर दबाव टाकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन तरुणीची काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून एका तरुणांसोबत ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी तरुणाने पीडित तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्न करण्यासाठी तगादा लावला. इतकच नाही तर लग्न न केल्यास ठार मारण्याची धमकी देखील दिली. घाबरलेल्या मुलीने थेट सिंहगड पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. सुरुवातीला सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिथून हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. माझ्या जीवाला धोका : पीडित तरुणी दरम्यान, गुन्हा दाखल झाला तेव्हापासून आरोपीवर कोणतीही कारवाई झाली नसून आरोपी अद्यापही मोकाट आहे. इतकच नाही तर गुन्हा मागे घ्यावा यासाठी आरोपी तरुणीवर दबाव टाकत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला ठार मारण्याची धमकी देत आहे. एकीकडे पोलीस कारवाई करत नाही तर आरोपी धमक्या देत आहे. यामुळे तरुणी घाबरली असून स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीचा शोध घेणे सुरू असल्याचे सांगितले आहे. आरोपीचा मोबाईल बंद असल्यामुळे त्याचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी सांगितले आहे.