पिंपरी | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

लोणावळा, (वार्ताहर) – एका गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
शाहिदास विठ्ठल काळे (वय २७ वर्षे, रा. कुसगाव, ता. मावळ जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीनुसार पीडित मुलगी अल्पवयीन असून घटनेतील आरोपी शाहिदास काळे याने ६ जुलै रोजी रात्री राहत्या घरी कोणी नसताना पीडितेला घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर बी.एन.एस.६५(१), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण सह अनुसुचीत जाती आणि अनुसुचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याची रवानगी आता येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक करीत आहेत.





