पुणे जिल्हा | पूर्व हवेलीत तीव्र पाणीटंचाई

सोरतापवाडी, (वार्ताहर) – एकेकाळी सुजलाम सुफलाम असणारा हवेली तालुका आता पाण्याअभावी दुष्काळी वाटू लागला आहे. पूर्व हवेलीला वरदान ठरलेला नवीन मुळा मुठा कालवा आता बंद केल्याने येणार्या काळात तीव्र पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची टंचाई येणार आहे.
पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, आळंदी, वळती, तरडे सोरतापवाडी, नायगाव, पेठ, उरुळी कांचन इत्यादी ठिकाणी शेतीच्या पाण्याची बिकट परिस्थिती असून हजारो एकर शेती पाण्याअभावी पडून आहे. शेतकर्यांना गेल्या चार वर्षांपासून अनेक संकटांनी ग्रासले असून करोनामुळे शेतकर्यांच्या मालाला बाजारभाव मिळाला नाही.
तर कधी अतिवृष्टीमुळे काढणीस आलेली पिके पाण्यामुळे खराब झाली. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यातच परिस्थिती सुधारत असल्याचे दिसत असताना मागील वर्षी पडलेल्या कमी पावसामुळे पूर्व हवेलीत दुष्काळ परिस्थिती झाली आहे.
विहिरीत पाणी अन् शेती कोरडी
ज्या शेतकर्यांकडे शेतीसाठी थोडे पाणी आहे. ते शेतीला देताना वीजेचा अडथळा येत आहे. सतत जाणार्या विजेमुळे पाणी विहिरीत आणि शेती कोरडी अशी अवस्था झाली आहे. नवीन मुळा मोठा कालवा आता बंद केल्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होणार असल्याचे अनेक शेतकर्यांनी सांगितले.
तसेच पूर्व हवेलीतील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुद्धा निर्माण झाली आहे. तर गावागावात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाच्या प्रतिक्षेत असून अजून महिनाभर अशीच परिस्थिती राहणार असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. त्यादरम्यान पाऊस पडला तर परिस्थितीत थोडा बदल होऊ शकतो.
पूर्व हवेलीत पाणीटंचाई तीव्र असून राहिलेल्या पाण्यात शेतीतील विजेच्या लपंडावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. -दत्तात्रय चौधरी, प्रगतशील शेतकरी पेठगाव
अनेक वर्षानंतर प्रथमच इतक्या प्रचंड प्रमाणात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून विहीर, बोरवेल व इतर पाण्याचे सोर्स बंद झाले असून शेतकर्यांची पिके जळून जायला लागली आहेत. पाण्याअभावी काही शेतकर्यांनी ऊस जळण्यापेक्षा कुट्टीला दिलेला आहे. त्यामुळे आता हजारो एकर जमीन पडून आहे. -भाऊसाहेब चौधरी, शेतकरी सोरतापवाडी
नियोजनानुसार सध्या कालव्याचे पाणी बंद केले आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत व 31 मे ला पाणीसाठ्याची माहिती घेऊन पुढील आवर्तन सोडण्यात येईल. -श्वेता कुर्हाडे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग खडकवासला





