ब्लादिमीर पुतीन यांचा बँड वाजवणाऱ्या सातजणी

दोहा : कतारमध्ये विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेची सांगता झालेली आहे. मात्र ही स्पर्धा गाजवली ती रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची खिल्ली उडवणाऱ्या सात जणींच्या बँडने. त्यांनी त्यांच्या संगीताद्वारे पुतीन यांची खिल्ली उडवण्याचा जणू ठेकाच घेतला आहे. रशियातील महिलांचा हा म्युझिक बँड त्यांच्या गाण्यातुन पुतीन यांना राजकीय विरोध करण्यासाठी प्रसिद्ध असल्याने प्रकाशझोतात आला आहे.
पुतीन यांच्याबरोबरच रशियातील सनातनी चर्चच्या विरोधातही हा महिलांचा बँड आवाज उठवत असतो. या बँडची व्यूहरचना यशस्वी झाली असती तर कदाचित अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील अंतिम सामना काही काळासाठी थांबवण्याची नामुष्कीय ओढवली असती. स्टेडियम मध्ये हा सामना चालू असतानाच स्टेडियमच्या बाहेरील दृश्य काही वेगळेच होते. काही लोक आतमध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये व्यत्यय आणण्याची योजना आखत होते. मध्येच रशियन निदर्शकांनी सुरक्षा व्यवस्था भेदून मैदानात घुसण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना मैदानात घुसण्याआधीच रोखले.
हे सगळे लोक रशियन महिलांचा म्युझिक बँड पसीरॉएटचे चाहते आणि समर्थक होते. युक्रेन मध्ये चालू असलेले युद्ध, रशियातील विरोधी नेते अलेक्सी नवलानी यांची अटक, इराणमध्ये महिलांवर चालू असणे असलेला अन्याय याच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळी स्टेडियम मध्ये घुसण्याची योजना आखत होते. मात्र, त्यांचा हा कट अयशस्वी ठरला आणि त्या सर्वांना सुरक्षारक्षकांनी अटक केली.
15 जुलै 2018 रोजी मॉस्को मध्ये विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यामध्ये झाला होता त्यावेळी पसीरॉएट बँडचे सदस्य स्टेडियम मध्ये घुसले होते. त्यामुळे सामना काही वेळासाठी थांबवावा लागला होता. त्यावेळी पसीरॉएट बँडच्या चार जणांना पंधरा दिवसाच्या कारावासाची शिक्षा झाली होती. त्याचबरोबर कोर्टाने या बँडच्या सर्व सदस्यांना पुढील तीन वर्षे कुठल्याही आंतरराष्ट्रीय क्रीडा कार्यक्रमात सहभागी होण्यावर बंदी घातली होती.
पसीरॉएट हा महिलांचा रॉक बँड आहे मॉस्कोतील या बँड मध्ये आधी 11 महिला होत्या आता त्यामध्ये केवळ सात जणी आहेत. मात्र हा बँड गाणी आणि संगीतापेक्षा राजकीय विरोध आणि वादासाठी जास्त प्रसिद्ध आहे. हा बँड प्रामुख्याने रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि सनातनी चर्चच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात असतो.
पसीरॉएटच्या मागण्या काय आहेत?
1) युक्रेन मध्ये सुरू असणारे युद्ध थांबवावे
2) रशियातील विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलानी यांना तुरुंगातून सोडण्यात यावे
3) इराणमधील महिलांवर होणारा अन्याय थांबवण्यात यावा
4) सोशल मीडियावर अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळावे
5) राजकीय सभा आणि मेळाव्यांमध्ये विनाकारण होणारे अटक सत्र थांबवले जावे





