ऐकणार ते पुणेकर कसले..!

पोलीस आणि पालिकेची व्यापक मोहीम सुरू
पुणे – करोनाची साथ ओसरली असली तरी, धोका टळलेला नसल्याचे आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञ घसा कोरडा होईपर्यंत सांगत असले तरी, ऐकणार ते पुणेकर कसले, याचीच प्रचिती पुन्हा एकदा शहरात आली आहे.
मास्क वापरणे महापालिकेने बंधनकारक केलेले असताना, तब्बल 1 लाख 53 हजार 783 विनामास्क पुणेकरांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल
7 कोटी 60 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे एरव्ही रिक्षावाले आणि भाजीवाल्यांसोबत पाच-दहा रुपयांसाठी वाद घालणारे पुणेकर विनामास्कसाठी 500 रुपयांचा दंड भरण्यास तयार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरात मार्च महिन्यापासून करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले असून आतापर्यंत रुग्णसंख्या सुमारे 1 लाख 64 हजारांवर गेली आहे. करोनावर कोणतीही लस नसल्याने या साथीला अटकाव घालण्यासाठी वारंवार हात धुणे, मास्क घालणे तसेच सामाजिक अंतर पाळणे याला कोणताही पर्याय
नाही. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क वापरणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. मास्क नसल्यास 500 रुपयांचा दंड निश्चित केला आहे.
मात्र, या निर्णयाकडे पुणेकर राजरोसपणे उलंघन करत असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेस ही कारवाई प्रत्येक वेळी शक्य नसल्याने या दंड वसुलीचे अधिकार महापालिकेने पोलिसांना दिले असून महापालिका आणि पोलिसांकडून स्वतंत्रपणे कारवाई केली जात आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत तब्बल 7 कोटी 60 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, दंड भरणाऱ्या पुणेकरांची संख्या 1 लाख 53 हजारांवर गेली असून दिवाळीमुळे होणाऱ्या गर्दीने ही कारवाई आणखी कडक करण्यात आली आहे.
थुंकी बहाद्दरांनी मोजले 6 लाख…
शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास महापालिकेने यापूर्वीच मनाई केली आहे. तर, रस्त्यांवर थुंकणाऱ्यांकडून करोना अधिक वेगाने पसरू शकतो. म्हणून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडूनही रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर जोरदार कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत पालिकेने सुमारे 4728 जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडूनही सुमारे 6 लाख 36 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.





