नगर | जिल्ह्यातील दहा महाविद्यालयांमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू

राहाता (प्रतिनिधी) – महसूल विभाग आणि महाविद्यालयांनी एकत्रित येऊन सुरू केलेला ‘युवा ही दुवा’ या उपक्रमाला पाठबळ देण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील दहा महाविद्यालयांमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू झाली आहेत. या महाविद्यालयांमधून आता शासकीय दाखले मिळण्याचा मार्ग अधिक सोपा होणार आहे.
संगमनेर महसूल विभागात प्रायोगिक तत्वावर ‘युवा ही दुवा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाच शासकीय दाखले देण्याबाबत प्रशिक्षण देऊन शासनाचे उपक्रम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संधी देण्यात आली होती. या उपविभागात यशस्वी झालेला हा प्रयोग आता जिल्ह्यातील अन्यही महाविद्यालयांमध्ये राबविण्याच्या हेतूने जिल्ह्यातील दहा महाविद्यालयांमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे.
मंत्री विखे पाटील यांनी ही सेतू सुविधा केंद्र “कमवा आणि शिका’ या योजनेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चालविली जावी तसेच दिव्यांग किंवा एकल महिलांनाही उपजिवीकेचे साधन म्हणून, ही केंद्र द्यावीत, अशी सूचना केली होती. त्याच अनुषंगाने आता अकोले तालुक्यातील आर्ट, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, दा.ज मालपाणी कॉलेज संगमनेर, आर्ट, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय आश्वी खुर्द, एस.एस.जी.एम महाविद्यालय कोपरगाव,
नामदेवराव परजणे पाटील कॉलेज संवत्सर,आर.बी.एन.बी कॉलेज श्रीरामपूर, आर्ट, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय सात्रळ, लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय राहुरी, एकनाथ आयुर्वेद महाविद्यालय शेवगाव, आर्ट, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय अळकुटी, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय लोणी, आर्ट, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय राहाता, आर्ट, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय कोल्हार, प्रेमराज सारडा महाविद्यालय, नगर, बाबुजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी, या सर्व महाविद्यालयांनी आता शासकीय दराप्रमाणे शासकीय दाखले वितरीत करण्याचे काम वितरीत करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.





