भरपाईचा दावा व्हॉट्स ऍपद्वारे निकाली

पुणे -मुलाच्या अपघातील मृत्यूनंतर भरपाईसाठी मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दाखल दावा करोनामुळे लांबला. वयस्कर आई-वडिलांना पुण्यात येणे कठीण व्हायचे. अखेर तंत्रज्ञान मदतीला धावले. पाच वर्षांपासून सुरू असलेल्या दावा व्हॉट्स ऍपवर प्रक्रिया करून निकाली काढण्यात आला.
मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश बी.पी.क्षीरसागर आणि ऍड. अतुल गुंजाळ यांनी निकाली काढलेल्या दाव्यात आई-वडिलांना 65 लाख रुपये मिळणार आहेत. या प्रक्रियेसाठी अर्जदारांचे वकील ऍड. के.के.बांदल, विमा कंपनीचे वकील ऍड. ऋषिकेश गानू, विमा कंपनीच्या अधिकारी पूजा पाटील यांनी सहकार्य केले.
अभिषेक (28, रा. दिल्ली) असे अपघाती मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तो 23 नोव्हेंबर 2017 रोजी द्रुतगती मार्गावर अपघात झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या 55 वर्षीय आई आणि 57 वर्षीय वडिलांनी या प्रकरणात फेब्रुवारी 2018 मध्ये येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे बजाज इंशुरन्स कंपनीविरोधात ऍड. के. के. बांदल यांच्यामार्फत दावा दाखल केला होता.
दाव्याची कागदपत्रे वकिलांनी अभिषेकच्या आई-वडिलांना पीडीएफद्वारे व्हॉट्सऍपवर पाठवली. त्यांनी प्रिंट काढली आणि स्वाक्षरी करून कागदपत्रे वकिलांना पाठविली. वकिलांनी प्रिंट काढून न्यायाधीशांपुढे कागदपत्रे सादर केली. न्यायाधीशांनी दोघांना व्हॉट्सऍप व्हिडिओ कॉल केला. कागदपत्रांवर “सही तुमचीच आहे का’ “तडजोडीची रक्कम बरोबर आहे का’ अशी विचारणा केली. दोघांनी होकार देताच हा दावा निकाली काढण्यात आला.
या दाव्यात वयस्कर दापत्याला दिल्ली येथून पुण्यात येणे अडचणीचे ठरत होते. लोकअदालतमध्ये व्हॉट्सअपद्वारे प्रक्रिया पार पाडून दावा निकाली काढण्यात आला. दोघांचा वेळ, पैशाची बचत झाली. प्रवास आणि होणाऱ्या मानसिक त्रासातून दोघांची मुक्तता झाली.
– ऍड. के.के.बांदल, अर्जदारांचे वकील.





