Ranya rao gold smuggling case: कर्नाटकच्या राजकारणात सध्या कन्नड अभिनेत्री रान्या राव हे नाव चर्चेत आहे. 14 किलो सोन्याच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेली रान्या राव सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. रान्याच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता, तो विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. रान्या राव कशी पकडली गेली? 3 मार्च रोजी, जेव्हा रान्या राव दुबईहून बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली तेव्हा तिने व्हीआयपी प्रोटोकॉल अंतर्गत ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. हा मार्ग अशा प्रवाशांसाठी आहे ज्यांच्याकडे घोषित करण्यासाठी काहीही नाही. मात्र मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने केलेल्या तपासादरम्यान अधिकाऱ्यांना रान्याच्या शरीरावर लपवलेल्या काही संशयास्पद वस्तू सापडल्या. अधिकाऱ्यांनी तपास केला असता रान्याने पट्टी आणि टिश्यूच्या साहाय्याने सोन्याची बिस्किटे कमरेला व पायाभोवती गुंडाळल्याचे आढळले. याशिवाय तिच्या चपला आणि जॅकेटच्या खिशातही सोन्याचे तुकडे लपवले होते. जप्त केलेले सोने 24 कॅरेटचे आणि 14.2 किलो वजनाचे होते, ज्याची किंमत अंदाजे 12.56 कोटी रुपये असल्याचे तपासात समोर आले आहे. कर्नाटकच्या राजकारणात खळबळ – रान्या राव च्या अटकेनंतर कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. सीबीआय आणि ईडी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या तस्करीमागे कोणती मोठी नावे असू शकतात, हे पाहिले जात आहे.