Indrayani Rice: इंद्रायणी तांदळाला फटका… पावसाच्या ओढीने उत्पादन ४० टक्क्यांनी घटणार?
बाजारभावात किलोमागे २० ते २५ रुपयांची वाढ होण्याचा अंदाज

– सोपान येवले
कान्हे – मावळ तालुक्यात यंदा ऐन हंगामात पावसाने दडी मारल्याने सुवासिक इंद्रायणी भाताच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाण्याअभावी उभी पिके करपल्याने इंद्रायणी तांदळाच्या उत्पादनात ३५ ते ४० टक्क्यांहून अधिक घट होण्याचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून आगामी काळात बाजारात इंद्रायणी तांदळाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
मावळ तालुक्यात दरवर्षी साधारणतः ५०० ते ५५० टन इंद्रायणी भाताचे उत्पादन होते. मात्र, यंदा हे उत्पादन घटून केवळ ३५० ते ४०० टनांपर्यंत मर्यादित राहण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. भाताच्या दाण्यांमध्ये भर पडण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दीर्घकाळ ओढ दिली.
त्यामुळे पिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. त्यामुळे अनेक भागांतील उभी पिके सुकून गेली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. उत्पादन घटल्याचा परिणाम बाजारभावावरही होण्याची शक्यता आहे. सध्या प्रतिकिलो ६५ ते ७० रुपये दराने विक्री होणाऱ्या इंद्रायणी तांदळाच्या दरात किलोमागे २० ते २५ रुपयांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ग्राहकांनाही महागाईचा फटका बसण्याची शक्यता व्यकेत केली जात आहे.
आंदर मावळ भागातील अनेक शेतजमिनी आंद्रा खोऱ्यापासून उंचावर आहेत. त्यामुळे या जमिनीत ओलावा टिकून राहत नाही. यंदा पावसाने ओढ दिल्याने बागायतदार शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. यंदा इंद्रायणी भाताचे उत्पादन घटणे स्वाभाविक असून बाजारात या तांदळाला चांगला दर मिळण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भेसळखोरांकडून फसवणूक होण्याची भीती
अस्सल इंद्रायणी तांदळाचे उत्पादन घटण्याबरोबरच दरवाढीची शक्यता असल्याने बाजारात भेसळीचे प्रकार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक किंवा हलक्या प्रतीच्या तांदळात सुगंधित पावडर मिसळून त्याची इंद्रायणी तांदूळ म्हणून विक्री केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी तांदूळ खरेदी करताना विशेष दक्षता घ्यावी. शक्यतो थेट शेतकऱ्यांकडून अस्सल इंद्रायणी तांदळाची खरेदी करावी, असे आवाहन शेतकरी बळीराम भोईरकर यांनी केले आहे.
‘अधिक नफ्याच्या उद्देशाने काही व्यापारी मावळच्या इंद्रायणी तांदळाच्या नावाला गालबोट लावण्याचे काम करत आहेत. तांदळातील भेसळ तसेच सुगंधित पावडरच्या वापराबाबत ग्राहकांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार करावी. ग्राहकांनी शक्यतो थेट शेतकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करावा.’ – मारुती साळे, तालुका कृषी अधिकारी, मावळ.
IT City : आयटीनगरीत प्रवाशांची मेट्रोला पसंती; रोज ५० हजारांचा प्रवास!





