सेट परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे – वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत 5 हजार 297 उमदेवार उत्तीर्ण झाले असून, त्याची टक्केवारी 6.64 इतकी आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा 26 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र व गोवा राज्यात घेण्यात आली होती. या परीक्षेला 79 हजार 774 उमदेवार बसले होते. त्यापैकी 5 हजार 297 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला अर्ज केलेल्यापैकी 81 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. यापूर्वी 27 डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा 6.73 टक्के लागला होता. यंदाचा सेटचा निकाल 6.64 टक्के इतका लागला आहे.
यासंदर्भात विद्यापीठाच्या सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस म्हणाले, निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उत्तीर्ण उमेदवारांना सेटचे प्रमाणपत्र दि. 4 फेब्रुवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होतील. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रमाणपत्र यंदाही ऑनलाइन प्राप्त होतील.




