पुणे जिल्हा | गावासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवा

नारायणगाव, (वार्ताहर) – शासनाने मंजूर केलेल्या 150 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन जुन्नर तालुक्यातील नारायणगाव आणि परिसरात भूमिपूजन, उद्घाटन करण्यात आले.
यामध्ये नारायणगाव व परिसरातील इतर रस्ते, सभागृहे बांधणे कामांचा समावेश आहे. गावासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून विकासाची भूमिका घेऊन प्रत्येकाने काम केले, पाहिजे असे प्रतिपादन आ. बेनके यांनी केले.
यावेळी युवा नेते अमित बेनके, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे, गणेश वाजगे, एकनाथ शेटे, जुबेर अत्तार, रामदास अभंग, अशोक पाटे, विलास पानसरे, शहर अध्यक्ष रोहिदास केदारी,
ऋषी वाजगे, सागर दरंदाळे, सोपान खैरे, राजेंद्र कोल्हे, शशिकांत वाजगे, हितेश कोर्हाळे, प्रवीण पाटे, यल्लू लोखंडे, तुषार पडवळ, नितीन शेंडे, वैजयंती कोर्हाळे, दिपाली खैरे, अनिता नाईक, ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस नारायणगाव शहर पदाधिकारी उपस्थित होते.
नारायणगावचे ग्रामदैवत श्री आई मुक्ताबाई मातेच्या आशिर्वादाने मला जनतेची कामे करण्याची ऊर्जा मिळते. स्व. वल्लभ बेनके यांनी मुक्ताबाई देवस्थान ट्रस्टला ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून दिला. नारायणगाव परिसरात विकासकामे प्रगतीपथावर आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने जुन्नर नारायणगाव गाव अंतर्गत रस्ता, बसस्थानक ते खोडद गाव अंतर्गत रस्ता, अष्टविनायक महामार्ग कोल्हे मळा रस्ता 25 कोटी, ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण कामासाठी 90 कोटी कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच कामाला सुरूवात होणार आहे. कोल्हे मळा येथील सावता महाराज मंदिराच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले आहे.
स्व. विठाबाई नारायणगावकर स्मारक, नाट्यगृह उभारणार
जुन्नर तालुका पर्यटन विकास आराखडा अंतर्गत गावचा अभिमान असलेल्या तमाशा सम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मारकाचे काम आणि त्यांच्या नावाने एक नाट्यगृह उभारणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
मीना डावा कालव्यावर एक कोटीचा नवीन साकव पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून नारायणगावच्या विकासासाठी कायम कटिबद्ध राहू असा विश्वास बेनके यांनी ग्रामस्थांना दिला.





