शेरपा कामी रिटा यांनी केले 28 वेळा सर्वोच्च शिखर पादाक्रांत काठमांडू : नेपाळचे शेरपा कामी रिटा यांनी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी आज तब्बल 28 व्या वेळी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आणि जास्तीत जास्त वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. आठवड्याभरापूर्वीच त्यांनी 27 व्या वेळी एव्हरेस्ट शिखर सर करून नवीन विक्रमाची नोंद केली होती. 53 वर्।ीय शेरपा कामी रिटा यांनी आज सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी 8 हजार 848.86 मीटर उंचीवरील एव्हरेस्ट शिखर सर केले असे, सेव्हन समिट ट्रेकच्या मोहिमेचे व्यवस्थापक छांग दावा शेरपा यांनी सांगितले. या मौसमामध्ये कामी रिटा यांनी लागोपाठ दोन वेळा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे. दिनांक 17 मे रोजीच त्यांनी 27 व्या वेळी एव्हरेस्टवर चढाई केली होती. एव्हरेस्टवर सर्वाधिक 26 वेळा यशस्वी चढाईचा विक्रम पूर्वीपासून कामी रिटा यांच्याच नावावर होता. काही दिवसांपूर्वी शेरपा पसांग दावा यांनी त्या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्यानंतर कामी रिटा लागोपाठ 2 वेळा एव्हरेस्टवर चढाई करून पुन्हा विक्रम आपल्या नावावर राखला आहे. त्यांनी सर्वात पहिल्यांदा 13 मे 1994 रोजी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती.