Budget session 2026 : विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन; दोन्ही सभागृहातील पदं रिक्त, 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरूवात
Budget session 2026 : सोमवार २३ फेब्रुवारीपासून राज्यविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत असून, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे.

Budget session 2026 : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार दि. २३ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून, ६ मार्चला अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, विधिमंडळाच्या इतिसाहात पहिल्यांदाच विधानसभा आणि विधापरिषदेतील विरोधी पक्षनेत्यांविना हे अधिवेशन पार पडणार आहे.
हिवाळी अधिवेशनात (Budget session 2026 ) दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पदावर बराच खल झाला. आता आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील पुन्हा यावरून खल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडील कोणत्याही पक्षाकडे विरोधी पक्षनेत्यापदासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिक्त आहे. दुसरीकडे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने ते निवृत्त झाले आहे. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद देखील रिक्त आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर दावा केला जात असून, विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आग्रही आहे. उद्धवसेनेकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यावर निर्णय झालेला नाही. विधिमंडळातील विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे.
विरोधी बाकावरील सर्वात मोठ्या पक्षाच्या सदस्यांची संख्या ही एकूण विधानसभा सदस्य संख्येच्या १० टक्के इतकी नसल्याचे कारण या निर्णयामागे असल्याचे सांगण्यात आले आहे. पण विरोधी पक्षनेत्यासाठी १० टक्के सदस्य संख्येची अट नाही. कारण या सभागृहात यापूर्वी १० टक्के सदस्य संख्या नसताना देखील विरोधी पक्षनेते पद देण्यात आले आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होणारे हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या अधिवेशनाकडे विशेष लक्ष असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खाते असल्याने तेच अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
हेही वाचा : PM Modi Israel Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसाच्या इस्रायल दौऱ्यावर जाणार ; मोठ्या कराराची अपेक्षा





