महामार्गालगतचे सर्व्हिस रस्ते पाण्याखाली; पुणे-बंगळुरू महामार्गाकडे ‘एनएचएआय’ प्रशासनाचे दुर्लक्ष

बावधन – महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यांवर ड्रेनेजसह पावसाचे पाणी साचत असल्याने हा रस्ता जलमय झाला आहे. पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्यावेळी गुडघाभर पाण्यात वाहने अडकत आहेत. पदपथ पाण्यात बुडाल्याने पादचाऱ्यांना डबक्यांतून चालावे लागत आहे. या रस्त्याची दुरूस्ती तत्काळ करावी, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडे (एनएचएआय) राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत दगडे पाटील यांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्गालगत असलेले सर्व्हिस रस्ते अरूंद, खड्डेमय असताना पावसामुळे ते पाण्याखाली गेल्याने वाहन चालवायची तरी कोठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बावधन येथील सीएनजी पंप येथून सर्व्हिस रस्त्याने बावधनकडे जाताना रस्त्यावर मोठ खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने या रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. या पाण्यातून दुचाकी नेताना खड्ड्यात गाडी आदळून अपघात होत आहेत. गंभीर अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न अभिजीत दगडे यांनी उपस्थित करीत महामार्गाच्या दोन्ही बाजूचे सर्व्हिस रस्त्यांची रूंदीकरण करावे पथदिवे सुरू करावेत तसेच ड्रेनेज लाइनची दुरूस्ती करावी, अशी मागणी केली आहे.
उड्डाणपुलाखाली तळे…
बावधन सीएनजी पंपासमोर विरूद्ध बाजूचा सर्व्हिस रोड, ट्रयु व्हॅल्यु शोरूम समोरील उड्डाणपूल आणि पुणेरी बिर्याणी हॉटेलजवळील रस्त्यावर पाणी साचत आहे. उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताच येत नाही. अनेकवेळा पाण्याचा अंदाज येत नसल्याने अपघात घडले आहेत. पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सर्व्हिस रस्त्यांची कामे तातडीने होणे गरजेचे आहे. परंतु, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवून ते सोडविण्याचा प्रयत्न आहे तसेच नागरिकांच्या मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे प्रथम कर्तव्य असल्याचे मला वाटते, असे सामाजिक कार्यकर्ते अभिजित राजेंद्र दगडे पाटील म्हणाले.





