महिला उमेदवारीचे भाजप नेत्यावर गंभीर आरोप; पोलीस बंदोबस्तात निवडणूक कार्यालय गाठलं, सोलापूर जिल्ह्यात काय घडलं?

Ujjwala Thite : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आज १७ नोव्हेंबर २०२५ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका नगरपंचायत निवडणुकीसाठी मोठे राजकीय नाट्य घडले आहे.
येथील नगराध्यक्ष पदाच्या महिला उमेदवाराने केलेल्या गंभीर आरोपांमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नेमकं मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जावरून काय घडलं आहे? संबंधित महिला उमेदवाराचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, या व्हिडीओत महिला उमेदवारीने भाजप आमदारावर गंभीर आरोप केले आहेत.
उज्वला थिंटेचा आमदार राजन पाटील यांच्यावर गंभीर आरोप
भाजप नेते आणि माजी आमदार राजन पाटील हे निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे थिटे यांनी उमेदवारी अर्ज भरू नये, यासाठी रस्त्यांवर जागोजागी अडथळे उभे केले जात आहेत. असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच उसाचे ट्रॅक्टर रस्त्यावर लावून जाण्याचे मार्ग बंद केले जात आहेत.
घटनेची जोरदार चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी अनगर नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना अडथळे आणण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यांनी पोलीस संरक्षण मिळावी अशी मागणी केली होती. अखेर पोलीस संरक्षण मिळाल्यानंतर त्या पहाटे पाच वाजताच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहचल्या आहेत. या घटनेची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
भाजप आमदाराच्या समर्थकांकडून पाठलाग?
उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणावर समर्थकांची गर्दी पाहायला मिळत आहे. काल उज्वला थिटे या अर्ज दाखल करण्याच्या प्रयत्नादरम्यान राजन पाटील यांच्या समर्थकांकडून पाठलाग करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पोलिसांनी योग्य संरक्षण दिलं नाही म्हणून त्यांनी मोहोळ पोलीस स्टेशनबाहेर उभं राहून संताप व्यक्त केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
थेट गनिमी कावा करत…
उज्वला थिटे पहाटे ५ वाजता पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहचल्या आहेत. यावर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी फेसबुकवरून व्हिडीओ शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. शिवबाची जिजामाता मोहोळ तालुक्याची रणरागिणी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मा. उज्वला थिटे-पाटील यांनी थेट गनिमी कावा करत पहाटे ५ वाजता अनगर नगरपंचायत कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. घड्याळ तेच… वेळ नवी! अशी पोस्ट पाटील यांनी लिहिली आहे.
राजकीय संघर्ष
अजित पवार गटाकडून अनगर नगरपंचायतीसाठी उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपकडून राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे राजकीय संघर्ष होण्याची तीव्र शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : राजस्थानमधील जोडप्याचा खास उपक्रम! हातरुमालावरील लग्नाची निमंत्रण पत्रिका ठरतेयं आकर्षक





