Pune District : भोसरी ते चाकण दरम्यान अपघातांची मालिका सुरूच
Pune District : रस्त्याची क्षमता आणि वाहनांची संख्या याचा ताळमेळ बसत नसल्याने दररोज वाहतूक कोंडी आणि त्यातून भीषण अपघात घडत आहेत. मोशी कचरा डेपो चौक, आळंदी फाटा आणि नाशिक फाटा ते चाकण दरम्यानचे चौक अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) बनले आहेत.

चिंबळी : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील भोसरी ते चाकण हा रस्ता वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक बनला असून, या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या काही दिवसांत या पट्ट्यात लहान-मोठे अनेक अपघात झाले असून, यात काहींना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकजण जखमी झाले आहेत. या भागातील वाढत्या अपघातांमुळे स्थानिक नागरिक, वाहनचालकांमध्ये असुरक्षितता आणि संतापाचे वातावरण आहे.
चाकण परिसरातील औद्योगिक वसाहतीमुळे (एमआयडीसी) या महामार्गावर अवजड कंटेनर, ट्रक आणि कंपन्यांच्या बसेसची चोवीस तास वर्दळ असते. सोबत नोकरदार वर्गाची दुचाकी आणि चारचाकी वाहनेही मोठ्या संख्येने याच मार्गावरून धावतात. रस्त्याची क्षमता आणि वाहनांची संख्या याचा ताळमेळ बसत नसल्याने दररोज वाहतूक कोंडी आणि त्यातून भीषण अपघात घडत आहेत. मोशी कचरा डेपो चौक, आळंदी फाटा आणि नाशिक फाटा ते चाकण दरम्यानचे चौक अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) बनले आहेत.
नागरिकांची मागणी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
वारंवार होणाऱ्या अपघातांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि स्थानिक वाहतूक पोलीस प्रशासनाकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. गतिरोधक बसवणे, दिशादर्शक फलक लावणे आणि बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. महामार्गावरील मृत्यूचे तांडव थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवासी संघटनांनी दिला आहे.
अपघातास कारण की…
रस्त्यांची दूरवस्था – अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असून काहीठिकाणी असमान रस्ते असणे.
नियोजनशून्य उड्डाणपूल : भोसरी, मोशी, चाकण परिसरातील उड्डाणपुलांचे अपूर्ण किंवा त्रुटीयुक्त नियोजन.
अतिवेग आणि ओव्हरटेकिंग : अवजड वाहनांची अनियंत्रित गती आणि चुकीच्या बाजूने ओव्हरटेकिंग करण्याची स्पर्धा.
अतिक्रमणे आणि बेशिस्त पार्किंग : रस्त्याच्या कडेला होणारी अवजड वाहनांची अवैध पार्किंग आणि वाढती अतिक्रमणे.
सुविधांचा अभाव : सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने महामार्गावर लावण्यात आलेले स्ट्रीट लाईट्स अनेक ठिकाणी बंद असणे.
हेही वाचा : Pune District : शारदानगर कृषी विज्ञान केंद्राला अजितदादांचे नाव द्या





