Sergey Lavrov : रशिया युरोपवर हल्ला करणार नाही,मात्र.. ; परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह काय म्हणाले?

संयुक्त राष्ट्र : रशिया आणि नाटोमध्ये तणाव वाढत असतानाच रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी रशिया युरोपातल्या देशांवर हल्ला करणार नाही, असे म्हटले आहे. युरोपवर हल्ल्याचा रशियाचा हेतू नाही. मात्र कोणत्याही आक्रमणाला निर्णायक प्रतिसाद दिला जाईल, असेही लावरोव्ह यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये ते बोलत होते.
रशियाकडून नाटो देशांच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यास नाटोने प्रतिबंध केला आहे. नाटोच्या लढा विमानांनी पोलंडमध्ये घुसलेली रशियाची ड्रोन पाडली आणि आपल्या हवाई हद्दीमध्ये घुसलेली रशियाच्या विमानांबाबत इस्टोनियाने तक्रार केल्यावर नाटो फार सतर्क झाले आहे. आपली विमाने इस्टोनियाच्या हद्दीत घुसल्याचे रशियाने नाकारले आहे. तसेच आपली ड्रोन पोलंडला लक्ष्य करण्यासाठी डागली गेली नव्हती, असेही म्हटले आहे.
तरी रशियाच्या संभाव्य हालचालींना तोंड देण्यासाठी युरोपकडून जय्यत तयारी केली गेली आहे. अशा हल्ल्यांना पूर्ण ताकदीनिशी तोंड दिले जाईल, असा इशाराही रशियाला दिला गेला आहे. युरोपातल्या देशांच्या हालचाली आपल्या देशासाठी धमकी असल्याचे लावरोव्ह यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांचे कौतुक
या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन युद्ध जिंकू शकेल, असे म्हणताना रशिया-युक्रेनमध्ये चर्चा व्हावी असे म्हटले होते. यामुळे अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याची आशा निर्माण झाली आहे. याबद्दल लावरोव्ह यांनी ट्रम्प यांना धन्यवाद दिले आहेत. जेव्हा रशिया आणि अमेरिकेच्या हितांमध्ये बाधा येत नसते, तेव्हा दोन्ही देशांना एकमेकांपासून धोका नसतो, असे लावरोव्ह म्हणाले. मात्र युरोपातले देश युक्रेनला पाठिंबा मिळण्यासाठी अमेरिकेचे लांगूलचालन करत असतात. मुत्सदेगिरीऐवजी निर्बंधांचा आग्रह धरला जात असतो. पण हा मार्ग यशस्वी होणार नाही, असे लावरोव्ह म्हणाले. रशिया युरोपवर हल्ला करणार नाही, पण आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देईल, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.





